ऐरोलीत एटीएम ला भीषण आग; एटीएम मशीन, कॅश डिपॉझिट मशीन जळाल्यामुळे मोठे नुकसान

या आगीत एटीएम मशीन, पासबुक एन्ट्री मशीन आणि रोख रक्कम डिपॉझिट करणारी मशीन पूर्णतः जळून खाक झाली आहे. अग्निशमन दलाच्या दोन गाड्या वेळेत पोहोचल्यामुळे पुढील दुर्घटना टळली. काही क्षणात आग आटोक्यात आणण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले असून सुदैवाने यात कोणतीही जीवित हानी झाली नाही.

    वाशी : ऐरोलीमधील पंजाब नॅशनल बँकेच्या एटीएमला काल रात्री उशीरा आग लागल्याची घटना घडली. आगीचे कारण अजून स्पष्ट झाले नसून ही आग शॉर्ट सर्किटने लागली असावी असा प्राथमिक अंदाज अग्निशमन दलाकडून व्यक्त करण्यात आला आहे. रात्री उशीरा ही आग लागली आणि काही मिनिटातच या आगीने रौद्र रूप धारण केले. यामुळे संपूर्ण एटीएम या आगीच्या भक्ष्यस्थानी पडले होते.

    या आगीत एटीएम मशीन, पासबुक एन्ट्री मशीन आणि रोख रक्कम डिपॉझिट करणारी मशीन पूर्णतः जळून खाक झाली आहे. अग्निशमन दलाच्या दोन गाड्या वेळेत पोहोचल्यामुळे पुढील दुर्घटना टळली. काही क्षणात आग आटोक्यात आणण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले असून सुदैवाने यात कोणतीही जीवित हानी झाली नाही.

    महत्त्वाचे म्हणजे या एटीएमच्या शेजारीच पेट्रोल पंप आहे. ही आग जर पेट्रोल पंपापर्यंत पोहोचली असती तर मात्र मोठी दुर्घटना घडू शकली असती. पण, अग्निशमन दलाच्या जवानांच्या सतर्कतेमुळे वेळीच आगीवर नियंत्रण मिळवता आल्यामुळे मोठा अनर्थ टळला. या अग्नितांडवात एटीएम मशीन, कॅश डिपॉझिट मशीन जळाल्यामुळे बँकेचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले असल्याची शक्यता नाकारता येत नाही.