thane celebrity

नोंदणी न करता नियम डावलून एका महिला सेलिब्रिटीने (Celebrity took vaccine as frontline worker) लस घेतल्याचे उघड झाले आहे.

  ठाणे: एकीकडे कोरोना प्रतिबंधात्मक लसीचा तुटवडा जाणवत(Vaccine Shortage) असून ठाणेकर नागरिकांना लस मिळणे मुश्कील झाले असताना, दुसरीकडे नोंदणी न करता नियम डावलून एका महिला सेलिब्रिटीने (Celebrity took vaccine as frontline worker) लस घेतल्याचे उघड झाले आहे.

  ठाणे पालिकेच्या पार्किंग प्लाझा येथे असलेल्या रुग्णालयात ही लस देण्यात आली असून या अभिनेत्रीची कोविड सेंटरची फ्रंट लाईन वर्कर म्हणून खोटे ओळखपत्र बनवण्यात आले असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. त्यामुळे या सेलिब्रिटीला ही लस कोणी दिली ? कशी दिली ? या संशोधनाचा विषय असला तरी नियमबाह्य लस दिल्याने पालिका प्रशासन चांगलेच गोत्यात येणार आहे.

  गेल्या अनेक दिवसांपासून लसीचा तुठवडा जाणवत आहे. त्यातच जेष्ठ नागरिक आणि तरुणांना लसीपासून मुकावे लागत असताना काही ठिकाणी लसीकरणासाठी वेंटिंग करावे लागत आहे, मात्र तमीळ अभिनेत्री मीरा चोप्रा या सेलिब्रिटीला थेट लस कशी देण्यात आली ? असा सवाल आता विरोधक विचारत आहेत. तसेच चुकीच्या पध्दतीने ओळखपत्र बनवून देणाऱ्या संबंधित एजन्सीवर देखील कारवाई करण्यात यावी, अशी मागणी भाजपने केली आहे.

  दरम्यान नियमबाह्य लस घेतल्यानंतर ही मीरा चोप्रा यांनी मोठ्या आवडीने लस घेतल्याचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. तसेच या फोटो बरोबर बनवण्यात आलेले खोटे ओळखपत्रदेखील पोस्ट करण्यात आले असून विरोधकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. तसेच नियमबाह्य लस देण्यात येणाऱ्याची चौकशी करून कारवाई करावी अशी मागणी विरोधकांनी केली आहे.

  परदेशात जाणाऱ्या विद्यार्थ्यांना लस नाही ; मग सेलिब्रिटीला लस कशी ?

  ठाण्यात अनेक विद्यार्थी परदेशात जाणार आहेत. त्यांना अजून लसीसाठी प्रतीक्षा करावी लागत आहे. ठाणे महापालिकेला विद्यार्थ्यांची चिंता नसून एका सेलिब्रिटीला लस देण्यात आली हे निंदनीय आहे. आतापर्यंत ठाण्याच्या लसीकरण केंद्राकर कोणत्या कोणत्या सेलिब्रिटीना नियमबाह्य लस देण्यात आली यांची समिती नेमून चौकशी करावी आणि संबंधितावर कारवाई करावी, अशी मागणी भाजप गटनेते मनोहर डुंबरे यांनी केली आहे.

  कारवाई केली जाईल

  सेलिब्रेटीला लस दिल्याबाबत माहिती घेऊ.तसेच संबंधिंत संस्थेकडून तिला ओळखपत्र कसे देण्यात आले, याचीही माहिती घेऊन पुढील कारवाई केली जाईल,असे स्पष्टीकरण ठाणे पालिकेचे अतिरिक्त आयुक्त गणेश देशमुख यांनी दिले आहे.