शेतीशाळा, बांधावर तूर लागवड,पिक विमा योजना या उपक्रमाअंतर्गत शेतकरी बांधवांना वेळोवेळी मार्गदर्शन – जिल्हाधिकारी डॉ कैलास शिंदे

पालघर : पालघर जिल्ह्यात कृषी विभागानं खरीप हंगामात १.१० लाख हेक्टर पेरणीच्या क्षेत्राचं नियोजन केलं असून त्यासाठी लागणाऱ्या रासायनिक खतांची आणि बियाण्याचं आवंटन शासनाकडून मंजूर करण्यात आलं

 पालघर : पालघर जिल्ह्यात कृषी विभागानं खरीप हंगामात १.१० लाख हेक्टर पेरणीच्या क्षेत्राचं नियोजन केलं असून त्यासाठी लागणाऱ्या रासायनिक खतांची आणि बियाण्याचं आवंटन शासनाकडून मंजूर करण्यात आलं असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ कैलास शिंदे यांनी दिली आहे.

खरीप हंगामात प्रामुख्यानं भात या पिकाची लागवड केली जाते.या व्यतिरिक्त काही प्रमाणात नागली आणि इतर कडधान्य पिकं घेतली जातात. जिल्ह्यात भाताच्या 22000 क्वी. बियान्यांची मागणी करण्यात आली असून आजच्या दिवसात बाजारात विविध कंपनीचे २४००० क्वी . ( ११० % ) इतके बियाणे उपलब्ध आहेत. तसचं रासायनिक खतांची जून अखेरसाठी ८७००० मेट्रिक टनाची मागणी नोंदविली असून आजच्या दिवसात बाजारात ८५०० मेट्रिक टन ( ९७ % ) इतक्या  रासायनिक खताची उपलब्धता आहे. त्यामुळे बाजारात कुठल्याही प्रकारच्या खतांची आणि बियाण्याची टंचाई नसल्याचं  जिल्हाधिकारी शिंदे यांनी सांगितले आहे.

शेतीशाळा :

जिल्ह्यात शेतकरी पूर्व मशागत आणि भात रोपवाटीकेच्या कामास सुरवात करत आहेत.खरीप हंगामात भात हे प्रमुख पिक असल्यानं हंगामात शेतकऱ्यांना भातपिका विषयी तांत्रिक मार्गदर्शन करण्यासाठी प्रत्येक कृषी सहाय्यकांच्या समवेत  शेतकाऱ्यांची शेतीशाळा आयोजित करण्यात येत आहे. यात बीज प्रक्रिया, रोपवाटिका व्यस्थापन, खत व्यस्थापन, कीड व्यस्थापन आदी विषयावर मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

बांधावर तूर लागवड :

आदिवासी कुटुंबाच्या दैनंदिन आहारात समतोल अन्नघटकांचा समावेश व्हावा यासाठी आदिवासी विभाग आणि कृषी विभागाच्या सहकार्यानं या खरीप हंगामात जिल्ह्यातल्या सर्व ६७००० आदिवासी शेतकऱ्यांना २५० ग्राम तुरीचं बियाणे मोफत वाटप करण्यात येत आहे. एक एकर क्षेत्रासाठी पुरेल इतके बियाणे वाटप करून त्याची लागवड शेतकरी आपापल्या भाताच्या शेताच्या बांधावर तुरीची लागवड करु शकतील. तुरीच्या लागवडीची पद्धत आणि त्याचं व्यस्थापन यासाठीचं मार्गदर्शन स्थानिक कृषी सहय्यक करणार आहेत. यासाठी सर्व आदिवासी शेतकऱ्यांनी आपल्या गावचे कृषी सहय्यक यांच्याशी संपर्क साधावा असं आवाहन जिल्हाधिका-यांकडून करण्यात आलय.

पिक विमा योजना :

पालघर जिल्ह्याचे प्रमुख फळपिक हे चिकू आहे. हवामानातल्या  होणाऱ्या बदलामुळे उत्पादनात घट होऊन शेतकऱ्यांचं नुकसान होऊ नये म्हणून शासनानं जिल्ह्यात हवामान आधारित फळपिक विमा योजना लागू केली आहे. या योजनेअंतर्गत विमा हप्ता भरण्याची शेवटची तारीख ३० जून ही आहे.पालघर जिल्ह्यातले  जव्हार आणि मोखाडा हे तालुके वगळता इतर सर्व तालुक्यासाठी हि योजना लागू करण्यात आली आहे.

योजनेत एक मोठा बदल करण्यात आला असून त्यानुसार सर्व शेतकऱ्यांना आपल्या बागेचा फोटो आणि अक्षांस / रेखांश अर्जासोबत द्यावे लागणार आहेत.त्यामुळे  ज्या शेतक-यांकडे मोबईलची सोय नसेल त्यांनी आपल्या गावच्या कृषी सहाय्यक यांच्याशी संपर्क साधावा असं आवाहन देखील जिल्हाधिका-यांनी केलं आहे.