गणेश नाईकांच्या मुखातून मंदाताईंचे कौतुक, नवी मुंबईत चर्चेला उधाण

सध्या शहरात पॅनल पद्धतीने निवडणूक होणार आहे. राज्यभरात महापालिका व नगरपरिषदांच्या निवडणुकांचा उत्सव एकत्र होणार असल्याने यास मिनी विधानसभा म्हंटले जात आहे. त्यामुळे भाजपा व मविआला या निवडणुकांमधून राज्यातील पुढील सत्ता खुणावत आहे.

  सिद्धेश प्रधान/ नवी मुंबई : नवी मुंबई महापालिका निवडणुका तोंडावर आलेल्या आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या नवी मुंबईतील वाढत्या दौऱ्याने भाजपासमोर आव्हान तयार करण्याचा प्रयत्न केला जात आहे. तर दुसऱ्या बाजूस भाजपात दादा व ताईंमध्ये सुरू असलेले शीतयुद्ध वेळोवेळी पाहण्यास मिळत आहे. असे असतानाच मंगळवारी मात्र नवी मुंबईकरांना राजकारणाची वेगळीच झलक पाहण्यास मिळाली.

  २०१९ च्या विधानसभा निवडणुकांनंतर अनेकदा एकमेकांसोबत व्यासपीठावर एकत्र येऊनही एकमेकांच्या नावांव्यतिरिक्त एकमेकांबद्दल जाहीररीत्या कौतुकास्पद चकार शब्द न काढणाऱ्या दादा ताईंबाबत वेगळेच दृष्य पाहण्यास मिळाले.  मंगळवारी गोवर्धनी मातेच्या दर्शनासाठी व लोकार्पणाच्या कार्यक्रमासाठी आलेल्या विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत आमदार गणेश नाईकांनी आ. मंदा म्हात्रें यांच्या कार्याचे कौतुक केले. आमदार गणेश नाईकांच्या मुखातून चक्क मंदाताईंचे कौतुक पाहून देवेंद्र फडणवीसांचे या दोन नेत्यांमधील कटुता दूर करण्याचे प्रयत्न यशस्वी होतायत की काय असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे.

  सध्या शहरात पॅनल पद्धतीने निवडणूक होणार आहे. राज्यभरात महापालिका व नगरपरिषदांच्या निवडणुकांचा उत्सव एकत्र होणार असल्याने यास मिनी विधानसभा म्हंटले जात आहे. त्यामुळे भाजपा व मविआला या निवडणुकांमधून राज्यातील पुढील सत्ता खुणावत आहे. त्यामुळेच की काय जिल्हा परिषदांच्या पोट निवडणुका देखील करू वा मारू या त्वेषाने लढल्या गेल्याचे चित्र संपूर्ण राज्याने अनुभवले. नवी मुंबईत देखील नेत्यांचे दौरे वाढले आहेत. भविष्यात नवी मुंबई हे शहर आर्थिकदृष्ट्या अधिक संपन्न होणार असल्याने त्यावर प्रत्येक पक्षाला आपली पकड हवी आहे.

  सध्या राज्यभरात  स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची तयारी सुरू झाली आहे. नवी मुंबईतील दौरे ते अधोरेखित करत आहेत. इतर वेळेस नवी मुंबईत क्वचित पाऊल ठेवणारे अजित पवार दर पंधरवड्याला नवी मुंबईचे दौरे करून प्रश्न जाणून ते सोडवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्या येण्याने राष्ट्रवादीचा कार्यकर्ता सुखावला असला तरी शिवसेना व काँग्रेसला मात्र त्यावर समाधान मानावे लागत आहे.  दुसऱ्या बाजूस भाजपामध्ये दादा ताईंमधील रस्सीखेच ही पक्षाला मारक ठरण्याची शक्यता जाणकार व्यक्त करत आहेत. त्यात पॅनल पद्धतीने निवडणुका असल्याने आव्हान कठीण आहे. त्यामुळे दादा ताईंनी एकत्र यावे अशी सुप्त चर्चा जुने नवे दोन्ही भाजपायी व्यक्त करत आहेत.

  पॅनलपद्धतीने आराखडे बांधल्यास ऐरोली विधानसभा क्षेत्रात शिवसेनेचे म्हणजेच मविआचे पारडे जड मानले जात आहे. त्यामुळे गणेश नाईक व संदीप नाईकांचा ऐरोली मतदार संघात राजकीय अनुभव पणास लागणार आहे. त्यामुळे दुसरीकडे। बेलपूर विधानसभा क्षेत्रातील उमेदवारांना आमदार मंदा म्हात्रे यांच्यावर अवलंबून राहावे लागणार आहे.

  मंदाताईंनी केलेली विकासकामे व आणलेले नवनवे प्रकल्प हे भाजपाच्या बेलापूरमधील उमेदवारांसाठी निवडणुकांचे लाभदायक मुद्दे ठरण्याची शक्यता आहे. त्यामुळे सध्या भाजपला या दोन्ही नेत्यांमध्ये समेट घडवून त्यातून तोडगा काढण्याची गरज वाटू लागली आहे.  आ.मंदा म्हात्रे यांनी जेट्टी व्हिजनवरून आमदार गणेश नाईकांविरोधात थेट घेतलेला आक्रमक पवित्रा पाहता हे पक्षासाठी लाभदायक नाही याची जाण फडणवीसांना आहे.

  अशात मध्यंतरी अचानक झालेला आशिष शेलारांनी आ. म्हात्रे यांची घेतलेली भेट ही सहज नसल्यासाज कोणीही नाकारू शकत नाही. राजकीय समीकरणे जुळवण्यात माहिर असलेल्या।गणेश नाईकांनी देखील आमदार मंदा म्हात्रे यांच्या कार्यक्रमात हजेरी लावत व मंदाताईनवर स्तुतिसुमने उधळत राजकीय द्रष्टेपणा दाखवला आहे. मंदा ताईंनी निर्माण केलेली स्वबळावरची कार्यकर्त्यांची व मातदारांची ताकद कोणीही नाकारू शकत नाही हे आ. नाईक जाणतात. त्यात पालिकेची एकहाती सत्ता आणणे मविआमुळे कठीण असल्याने, व शिवसेनेची वाढती ताकद पाहता दादांना ताईंची तुल्यबळ साथ लागणार आहे. त्यामुळे दादांनी फडणवीसांसमोर टाळीसाठी हात पूढे केलेला असताना ताई टाळी देतात का? ते लवकरच पाहण्यास मिळणार आहे.

  आमदार मंदा म्हात्रे यांचा स्वतंत्र वर्ग बेलापूरसह नवी मुंबईत आहे. त्यातच त्यांनी आणलेले नवनवे प्रकल्प हे त्यांची विकासात्मक दूरदृष्टी सिद्ध करत आहे. मुख्य म्हणजे त्यांच्यामुळे भाजपाचे मतदार नवी मुंबईत वाढल्याचे आकडेवारीवरून दिसत आहे. त्याचा फायदा अपोआप पक्षाला होणार आहे. पक्षाचा गाभा असलेला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे वजन देखील ताईंच्या पारड्यात आहे. हे सर्व आमदार गणेश नाईक जाणून आहेत.