भिवंडीत नोकरीच्या कामाची चौकशी करून घरी परतणाऱ्या महिलेवर सामूहिक बलात्कार

पोलिसांनी चार जणांच्या आवळल्या मुसक्या

भिवंडी :  शहरालगतच्या गोदाम पट्यातील राहनाळ ग्रामपंचायत हद्दीतील रेल्वेलाईन येथे राहणाऱ्या मैत्रिणीकडे कामाची चौकशी करून घरी परतणाऱ्या ४२ वर्षीय महिलेवर पाच जणांच्या टोळक्याने शस्त्राचा धाक दाखवून तिच्यावर अमानुष सामूहिक बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे.या घटनेने परिसरात संतापाचे वातावरण पसरले आहे .भिवंडी शहरालगतच्या ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर गोदाम व्यवसाय फोफावला आहे.या गोदामांमध्ये मजुरीच्या कामासाठी हजारो स्त्री पुरुष येत आहेत. मात्र सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन असल्याने काम मिळत नाही.त्यामुळे नवीन कामाच्या शोधात एक ४२ वर्षीय महिला चरणीपाडा परिसरात आपल्या मैत्रीणीकडे नव्या कामाच्या चौकशीसाठी काल सायंकाळी गेली होती. मैत्रिणीकडे चहापान उरकून पिडीत महिला रात्री उशिराने ती एकटीच राहनाळ ग्रामपंचायत हद्दीतील रेल्वेलाईन शेजारील मुनिसुरत कंपाऊंडमधून काटेरी  झाडाझुडपाच्या आडवाटेने आपल्या चरणीपाडा येथे घरी चालली होती.त्यावेळी रस्त्यात मद्यपी पाच युवकांच्या टोळक्याने महिलेस शस्त्राचा धाक दाखवून तिच्यावर आळीपाळीने अमानुष बलात्कार केला.या घटनेत अत्याचारग्रस्त महिला बेशुद्धावस्थेत त्याच ठिकाणी पडून होती.दुसऱ्या दिवशी या महिलेची माहिती नारपोली पोलिसांना समजताच पोलिसांनी महिलेस उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे.महिलेने आपल्यावर झालेल्या अत्याचाराची माहिती दिल्यावर पोलिसांनी अज्ञात अत्याचार करणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करून जखमी महिलेस ठाणे येथील कळवा रुग्णालयात उपचारासाठी हलवले आहे.

दरम्यान, या अत्याचाराची नारपोली पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक मालोजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस पथकाने अवघ्या काही तासात तपास करून माँटी कैलास वरटे (२५), विशाल कैलास वरटे (२३ ) दोघेही रा.भिवंडी , कुमार डाकू राठोड (२५ रा.पुर्णा ),अनिल कुमार शयाम बिहारी गुप्ता, (२८) यांना ताब्यात घेऊन नारपोली पोलीस ठाण्यात भादवि. कलम ३७६(ड), ३४१ ,३२४,३२३ अन्वये गुन्हा दाखल करून त्यांना रविवारी भिवंडी न्यायालयात हजर केले असता या चौघांनाही ८ ऑगष्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.अधिक तपास पोलिस निरीक्षक रविंद्र वाणी करीत आहेत.