कल्याणचा स्कायवॉक बनलाय गर्दुल्ले, गुन्हेगारांचा अड्डा ; तरुणीची छेडछाड तर युवकावर वार…

स्कायवॉकवर (Skywalk) गर्दुल्यांचा वावर वाढल्याने रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना येथून ये-जा करणे धोकादायक झाले आहे. नुकतेच येथे एका तरुणीची छेड काढण्यात आली असता तिने या गुर्दूल्यांपैकी एकाला पकडून चोप दिल्याचा व्हिडिओ व्हायरल (Video Viral) झालेली घटना ताजी असताना आता एक ३० वर्षाच्या युवकाला येथे मारहाण करत तीक्ष्ण हत्यारांने वार करीत लुटल्याची घटना घडली आहे.

कल्याण : कल्याण स्टेशन (Kalyan Station) परिसरातील पूर्व-पश्चिमला (East-West)  जोडणाऱ्या स्कायवॉकवर (Skywalk) गर्दुल्यांचा वावर वाढल्याने रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना येथून ये-जा करणे धोकादायक झाले आहे. नुकतेच येथे एका तरुणीची छेड काढण्यात आली असता तिने या गुर्दूल्यांपैकी एकाला पकडून चोप दिल्याचा व्हिडिओ व्हायरल (Video Viral) झालेली घटना ताजी असताना आता एक ३० वर्षाच्या युवकाला येथे मारहाण करत तीक्ष्ण हत्यारांने वार करीत लुटल्याची घटना घडली आहे. यामुळे स्कायवॉकवरून जीव मुठीत घेऊन जावे लागत आहे.

निलेश इंगळे हा युवक नवी मुंबई येथे कामाला आहे. तो रात्री या स्कायवाकहून घरी जात असताना त्याला लुटण्यात आले. यावेळी मारहाण करीत त्याचा मोबाइल काढून घेण्यात आला. या प्रकरणी महात्मा फुले चौक पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी एका युवतीला छेडण्यात आल्याने तिने पकडून गर्दुल्याला मारहाण केली होती.

कल्याण पूर्वेकडून पश्चिमेला जाताना या स्कायवॉकच्या पुढे कोळसेवाडीकडे जाणाऱ्या रस्त्यावर काही वर्षांपूर्वी एका इसमाला गर्दुल्यांनी लुटण्याच्यासाठी त्याची हत्या केल्याची घटना घडली होती. तेव्हा सीसीटीव्ही व सुरक्षा रक्षकाची गस्त ठेवण्यात आली होती. पण त्यानंतर याबाबत शिथिलता आल्याचे दिसून येत होते. त्यामुळे आता येथे प्रवासी सुरक्षा वाऱ्यावर आहे.

कोविड काळात व रेल्वे पादचारी पूल यामध्ये जाणे-येणे बंद केले असल्याने रेल्वे ब्रिज वरील पोलीस स्कायवॉकवर येऊ शकत नाहीत. त्यामुळे असे प्रकार सुरू असल्याचे दिसून येत आहे. सर्व सामन्यांना लोकल प्रवास करण्यास भूभा नसल्याने गर्दी कमी असल्याने देखील लुटमारीच्या घटना घडत असल्याचे याबाबत बोलले जात आहे. दरम्यान पोलीस यंत्रणेसह पालिका प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची मागणी नागरिक करत आहेत.