goats

कल्याण(Kalyan), मुंब्रा, भिवंडी परिसरात मुस्लीम बहुल भाग असल्याने बकरी ईदच्या निमित्ताने(Bakri Eid) कल्याणच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बैल बाजारात बकऱ्यांचा बाजार भरला आहे.

    दत्ता बाठे, कल्याण : रविवारपासून कोसळणाऱ्या पावसामुळे(Heavy Rain) ग्राहक नसल्याने कल्याणचा बकरा बाजार(Goat market) मंदावल्याचे चित्र आज पाहायला मिळाले. कल्याण(Kalyan), मुंब्रा, भिवंडी परिसरात मुस्लीम बहुल भाग असल्याने बकरी ईदच्या निमित्ताने(Bakri Eid) कल्याणच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बैल बाजारात बकऱ्यांचा बाजार भरला आहे. या बाजारात राजस्थान, मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश आणि गुजरातमधून १७ हजार बकऱ्यांची आवक झाली असून सतत पडणाऱ्या पावसामुळे ग्राहकांनी बकरा खरेदीसाठी पाठ फिरवल्याने सुमारे ४ हजार बकऱ्यांचीच विक्री झाली आहे.

    गेल्यावर्षी कोरोना आणि लॉकडाऊन मुळे बाजार समितीमधील बकरी बाजार बंद ठेवण्यात आला होता तर राज्याच्या सीमादेखील बंद करण्यात आल्याने ईदसाठी बकरे मिळणे कठीण झाले होते. मात्र यंदा शासनाने सीमा सुरु केल्या असून निर्बंध बरेचसे शिथील केले आहेत. तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईमधील देवनार येथील बकऱ्यांचा बाजार देखील बंद करण्यात आल्याने कल्याणमध्ये बकऱ्यांचे आवक वाढली आहे. गेल्या वर्षी १२ हजार ८०० बकऱ्यांची आवक झाली होती यावर्षी मात्र ही संख्या वाढली असून तब्बल १७ हजार बकऱ्यांची आवक झाली आहे.

    यावर्षी बाजार जरी सुरु असला तरी पावसामुळे बकरा खरेदीला ग्राहक नसल्याने याचा परिणाम बकरी बाजारावर झाला आहे. १७ हजार बकऱ्यांची आवक जरी झाली असली तरी आत्तापर्यंत फक्त ४ हजार बकऱ्यांचीच विक्री झाली आहे. बाजारात कोरोनाच्या दृष्टीने सर्व नियम पाळले जात असून सतत पडत असणाऱ्या पावसात बकरे आणि व्यापारी यांच्या सुरक्षेची काळजी घेत असल्याची माहिती या बाजाराचे व्यवस्थापक संजय उकिरडे यांनी दिली.

    ठाणे जिल्ह्यातील सर्वात मोठा बकरी बाजार म्हणून कल्याणच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बाजाराची ओळख आहे. या बाजारात मुंबई, ठाणे आणि ग्रामीण परिसरातील मुस्लिम बांधवानी २१ जुलै रोजी असलेल्या बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर बोकड खरेदीसाठी थोडीफार गर्दी केली होती. यामुळे आठवड्याभरात बोकडांची खरेदी- विक्रीतून कोट्यवधी रुपयांची उलाढाल झाली आहे.

    या बकरी बाजारात बकरी ईदसाठी महिनाभर आधीपासून मुस्लिम बांधव बोकडांची खरेदीला सुरवात करतात. कुर्बानीसाठी खरेदी केलेल्या बोकडांना खाऊ पिऊ घातले जाते. त्यानंतर बकरी ईदच्या दिवशी धार्मिक विधी करून त्याची कुर्बानी दिली जाते. कुर्बानीच्या एका बोकडाची किंमत १२ ते ४० हजार रुपयांपर्यत आहे. मात्र उपनगरीय शहरातील धकाधकीच्या जीवनात अनेकांना बकरी ईदसाठी महिनाभर बोकड घेणे जमत नाही. त्यामुळे बकरी ईदच्या दोन-तीन दिवस आधी बोकडांची खरेदी या बाजारात मोठ्या प्रमाणात होते. मागील आठवडाभरापासून बाजारात हजारो कुर्बानीच्या बोकडांची आवक झाली. त्यामध्ये राजस्थान, गुजरात, मध्यप्रदेश आणि कर्नाटक राज्यातून बोकडे – बकऱ्या विक्रीसाठी आल्या आहेत.