गोविंदा गेला रे गेला आता वर्षभर मटकी सांभाळ रे कुंभारा !

पनवेल  :  “गोविंदा गेला रे गेला आता वर्षभर  मटकी सांभाळ रे कुंभारा”, असे म्हणायची वेळ यंदा कुंभार समाजावर आली आहे . या वर्षी गोकूळ अष्टमी दोन दिवसावर आली तरी हंडीसाठी मडकी घ्यायला कोणी येत नसल्याने कुंभार समाजावर उपासमारीची पाळी येणार आहे. पनवेल मधील कुंभार वाड्यातील दैवत आणि ज्ञानेश्वर हे पनवेलकर बंधु दरवर्षी दहीहंडीसाठी मडकी बनवीत असतात. आज त्यांच्याकडे शेकडो रंगवलेली मडकी तयार आहेत. पण कोरोनामुळे दहीहंडी उत्सवाला बंदी असल्याने त्यांना यावर्षी लाखो रुपयांचे नुकसान सोसावे लागणार असल्याचे त्यांनी सांगितले .  

श्रावण वध अष्टमी हा श्रीकृष्णाचा जन्म दिवस. श्रीकृष्ण हा  भारतीयांची लाडक देव. त्यामुळे गोकुळाष्टमी-कृष्णाष्टमीचा हा उत्सव मोठ्या थाटामाटाने सर्वत्र साजरा केला जातो. मंदिरातून आरास केली जाते. रात्री १२ वाजता श्रीकृष्ण जन्म सोहळा केला जातो. भजन, पूजन, कीर्तन इ. अनेक कार्यक्रम आयोजित केले जातात. गोकुळाष्टमीचा उपवास हा त्या दिवशी सोडला जात नाही तर तो दुसर्‍या दिवशी सोडतात. त्यालाच कृष्णाष्टमीचे पारणे असे म्हणतात.दुसर्‍या दिवशी शहरात, गावा-गावांत, चौका-चौकांत दही हंडी लावली जाते. कृष्ण नामाच्या गजरांत ती फोडली जाते. आनंदोत्सव साजरा केला जातो. नवयुवकांसाठी हा एक विलक्षण उत्साहाचा आणि आनंदाचा दिवस असतो.

 यंदा मंगळवार ११ ऑगस्ट रोजी मध्यरात्री श्री कृष्णाचा जन्म आणि बुधवारी दहीहंडी उत्सव आहे पण कोरोंनाच्या संकटामुळे शासनाने दहीहंडी फोडताना सोशल डिस्टन्सिंग पाळता येणे शक्य नसल्याने त्यावर बंदी घातली आहे. त्यामुळे गोविंदा आला रे, आला जरा मटकी सांभाल रे बृजबाला म्हणत प्रत्येक घराघरात पाणी घेण्यासाठी गोविंदा येणार नाही. हंडी बांधण्याला परवानगी नसल्याने यंदा रंगवलेल्या मडक्यांना बाजारात मागणी नसल्याचे  दैवत आणि ज्ञानेश्वर या  पनवेलकर बंधूंनी सांगितले. पनवेलच्या कुंभार वाड्यात रहाणार्‍या या पनवेलकर कुटुंबाचा ही रंगीत मडकी बनवणे हा पिढीजात धंदा आहे. दरवर्षी  रक्षा बंधनाच्या दुसर्‍या दिवसापासून  हे दोन बंधु , त्यांच्या पत्नी आणि छोटा मुलगा मडकी रंगवण्याचे काम सुरू करतात. त्यांचा घाऊक विक्रीचा धंदा असल्याने दरवर्षी मोठ्या प्रमाणात ऑर्डर असते सतत फोन येत असतात यंदा आम्ही फोन लावला तरी ऑर्डर मिळत नसल्याचे ते सांगतात

या दही हंडीसाठी लागणारी मडकी गुजरात मधून आणली जातात त्याची ऑर्डर मे महिन्यातच आधीच द्यावी लागते. दरवर्षी हजार – बाराशे मडकी लागतात . त्यांना रंगवण्यासाठी गणपतीसाठीचे रंग, ब्रश आणावे लागतात त्याच्या किमती वाढल्या आहेत. यासाठी लाखो रुपयांचे भांडवल लागते ते कर्ज काढून उभे करण्यात येते. रंगवलेली मडकी नंतर उपयोगी नसल्याने ती पुढील वर्षा पर्यन्त सांभाळून ठेवावी लागतात. दर वर्षी १० -१२ मडकी शिल्लक राहतात. कोरोनामुळे यंदा धंदा नसल्याने  २५-३० मडकी ही विकली न गेल्याने शेकडो मडकी  सांभाळून कशी ठेवायची हा प्रश्न ही निर्माण झाला आहे.  डोक्यावर कर्जाचा बोजा वाढणार आहे. त्यामूळे कुटुंबावर मोठे आर्थिक संकट आले असल्याचे पनवेलकर बंधूंनी सांगितले