शासनाने शाळा संस्थाचालकांनाही मदत करण्याची मागणी

कल्याण : इंग्रजी शाळा संस्थाचालकाने आत्महत्या करण्यास सुरुवात केली असून भंडारा जिल्ह्यातील पलसपानी तालुका साकोली येथील इंग्रजी शाळा संस्थाचालक महेंद्र मेश्राम यांनी ६ जून रोजी शासनाच्या वारंवार

कल्याण : इंग्रजी शाळा संस्थाचालकाने आत्महत्या करण्यास सुरुवात केली असून भंडारा जिल्ह्यातील पलसपानी तालुका साकोली येथील इंग्रजी शाळा संस्थाचालक महेंद्र मेश्राम यांनी ६ जून रोजी शासनाच्या वारंवार बदलत्या धोरणाला कंटाळून शाळेतच फाशी घेऊन आत्महत्या केली. शासनाचे बदलते धोरण या आत्महत्या करण्याचे प्रमुख कारण असल्याचा आरोप मेस्टाने (महाराष्ट्र इंग्लिश स्कूल ट्रस्टी असोसिएशन) केला असून आता शासनाने शाळा संस्थाचालकांनाही मदत करण्याची मागणी शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड आणि विधानसभा अध्यक्ष नानाभाऊ पाटोले यांच्याकडे केली आहे.

शासनाने संस्था चालकांना मागील वर्षाची थकीत फी वसूल करू नये, पुढील वर्षीच्या फीसाठी सक्ती करू नये, चालू वर्षी फी वाढ करु नये, असे आदेश दिले आहेत. त्यातच आरटीई २५% मोफत प्रवेशाचे फी परतावे अजून पुर्ण दिले नाहीत. यामुळे शिक्षकांचे पगार कसे करायचे, शाळा उभारणीसाठी घेतलेले कर्ज कसे फेडायचे, पुढे शाळा कशी चालवायची या विवंचनेतून मानसिक संतुलन खचल्यामुळे सदर संस्थाचालकाने आत्महत्या केली असून कुटूंबातील कर्ता व्यक्ती आणि तोही तरूण वयातील हरपल्याने त्याच्या कुटूंबावर मोठे आर्थिक संकट उभे राहिले आहे. तरी शासकीय स्तरावरून या प्रकरणाची दखल घेऊन संबंधित संस्थाचालकाला ताबडतोब आर्थिक मदतीचा हात द्यावा. तसेच येथून पुढे कुठल्याही संस्थाचालकावर अशी वेळ येऊ नये यासाठी उपाययोजना करण्यात यावी. शासनाने संस्थाचालकांच्या मागेही उभे राहून सहकार्य करण्याची गरज आहे असे डॉ. विनोद कुलकर्णी यांनी सांगितले. तसेच एका निवेदनाद्वारे विधानसभा अध्यक्ष नानाभाऊ पटोले यांना विनंती केली असल्याची माहिती महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष संजय तायडे आणि मुंबई प्रदेशाध्यक्ष डॉ.विनोद कुलकर्णी यांनी दिली.