गुजरात येथून तीन ट्रकमध्ये आलेला ६५ लाखांचा गुटखा भिवंडीत जप्त 

  • ठाणे येथील अन्न सुरक्षा पथकाने भिवंडी तालुक्यातील खारबाव येथे रात्रभर पाळत ठेवून, तीन ट्रक मधून भिवंडी च्या दिशेने येणाऱ्या तीन ट्रक मधील २८० गोण्यात असलेला ६५ लाख ७८ हजार रुपय किमतीचा विमल सुगंधित पान मसाला व गुटखा व ३६ लाख रुपयांचे तीन ट्रक ताब्यात घेत कारवाई केली आहे .

भिवंडी : महाराष्ट्रात सुगंधी तंबाखू व गुटखा विक्रीस प्रतिबंध असतानाही शेजारील गुजरात राज्यातून विविध मार्गे कोट्यवधी रुपयांचा गुटखा, पान मसाला महाराष्ट्रात विक्री केला जात आहे. ठाणे येथील अन्न सुरक्षा पथकाने भिवंडी तालुक्यातील खारबाव येथे रात्रभर पाळत ठेवून, तीन ट्रक मधून भिवंडी च्या दिशेने येणाऱ्या तीन ट्रक मधील २८० गोण्यात असलेला ६५ लाख ७८ हजार रुपय किमतीचा विमल सुगंधित पान मसाला व गुटखा व ३६ लाख रुपयांचे तीन ट्रक ताब्यात घेत कारवाई केली आहे .

ठाणे अन्न सुरक्षा विभागाचे सहाय्यक आयुक्त भूषण मोरे यांना गुप्त बातमीदारा मार्फत भिवंडी शहराच्या दिशेने गुजरात येथून तीन ट्रक मधून गुटखा व सुगंधित तंबाखू येत असल्याची माहिती समजली. अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त अरुण उन्हाळे व कोकण विभाग सह आयुक्त शिवाजी देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा निरीक्षक माणिक जाधव, एस एम वधारकर ,एम एम सानप ,ए डी खडके या पथकाने खारबाव येथे एक धाब्यावर रात्रभर पाळत ठेवून होते. पहाटेच्या सुमारास पंधरा पंधरा मिनिटांच्या अंतराने आलेले तीन आयशर ट्रक क्रमांक  MH ०४ HY ९३७ , DN ०९ K ९४७२ ,DN ०९ S ९६९१ हे ट्रक आले. त्यांना अडवून त्यांची तपासणी केली. त्यामध्ये २८० गोणी विमल सुगंधित पान मसाला व तंबाखू गुटखा आढळून आला. या कारवाईत ट्रक चालक मोहम्मद आदिल व उदल यादव यांना ताब्यात घेतले. परंतु तिसरा ट्रक चालक अंधाराचा फायदा घेत पसार झाला. या कारवाईत ६५ लाख ७८ हजार रुपयांचा गुटखा व ३६ लाख रुपयांचे ट्रक असा एकूण १ कोटी १ लाख ७८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करीत भिवंडी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करीत सर्व मुद्देमाल जप्त केला आहे.