bhivandi building survivor

शरद धुमाळ, भिवंडी : भिवंडीतील इमारत दुर्घटनेतील(bhivandi building collapsed) ढिगाऱ्याखाली १० तास अडकून पडलेल्या एका व्यक्तीने मृत्यू डोळ्यासमोर पाहीला. मृत्यूशी झुंज देतानाचा मरण्याचा व जगण्याच्या थराराची कथा त्याने प्रसार माध्यमांसमोर मांडली आहे. विशेष म्हणजे ढिगाऱ्याखाली सुमारे १० तास अडकून पडलेल्या या व्यक्तीकडे केवळ एक लिटर पाण्याची बाटली आणि मोबाईल होता. त्याचे नाव खालिद खान असून तो दुर्घटनाग्रस्त इमारतीच्या पहिल्या मजल्यावर कुटूंबासह राहत होता.

त्याला वाटलं की, आपण आता वाचू शकत नाही. यामुळे त्याने ढिगाऱ्याखालीच मोबाईलवर दुर्घटनेत घडलेला थरार व मुलांनो आईला त्रास देऊ नका, असा व्हिडीओ तयार केला. त्यातच ढिगाऱ्याखाली असताना त्याने अनेकांशी मोबाईलवरून संपर्क केला होता. मात्र नेटवर्क मिळत नव्हते. अशातच त्याचे नशीब बलवत्तर म्हणून बचाव पथकाला त्याचा आवाज ऐकून त्याला १० तासानंतर ढिगाऱ्यातून बाहेर काढण्यात यश आले. त्यामुळे या घटनेचा थरार समोर आला. उघड्या डोळ्याने मी मृत्यू पाहिला पण खुदाने माझ्यासाठी बंदे पाठवून मला वाचवले.

त्याचा भाऊ याच दुर्घटनाग्रस्त इमारतीमध्ये दुसऱ्या मजल्यावर राहत होता. या जिलानी इमारतीमध्ये त्यांचे तीन फ्लॅट होते. दुर्घटनेतून बचावलेला खालिद खान याचे भिवंडीतील धामणकर नाका परिसरात मोबाईल विक्रीचे दुकान आहे. मात्र लॉकडाऊन असल्याने व्यवसाय बंद होता. त्यामुळे त्याने पत्नी व मुलांना मूळ गावी पाठवून दिल्याने खालिद घरात एकटाच होता. तर तिसऱ्या मजल्यावर आई ,वडील व बहीण राहत होती. यांनाही बचाव पथकाने सुखरूप बाहेर काढले आहे.मात्र दुसऱ्या मजल्यावर राहणाऱ्या खालिदच्या  भावाचे संपुर्ण कुटूंब या दुर्घटनेत बळी गेल्याने त्याला मोठा धक्का बसला आहे.

दरम्यान उपचार करून आल्यानंतर त्याने एनडीआरएफ, व टीडीआरएफ पथकाचे आभार व्यक्त करण्यासाठी त्यांच्यासोबत काही काळ ढिगारा उपसण्याचे कामही केले. माझ्यासाठी बचाव पथक देवासारखे धावून आल्याची प्रतिक्रियाही खालिदने दिली.या दुर्घटनेत १९ रहिवाशी जखमी असल्याचे सांगण्यात आले आहे.तर बचावकार्य गुरुवारी सकाळी साडेअकरा वाजता थांबवण्यात येऊन मृतांचा आकडा ३९ असल्याचे पालिका व पोलीस प्रशासनाने जाहीर केले आहे.