३२ लाखांचा चुना लागला पण ‘ते’ कंत्राट काही त्याला मिळाले नाही; खंडणी विरोधी पथकाची धडक कारवाई

ठाणे : आयुध कारखान्याच्या उपहार गृह चालविण्याचा ठेका देण्याचे अमिश दाखवून तब्बल ३२ लाखाचा चुना लावल्याची घटना ठाण्यात घडली आहे. गंडा घालणाऱ्या भामट्याला ठाणे खंडणी विरोधी पथकाने बेड्या ठोकलेल्या आहेत. या प्रकरणी कासारवडवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

रोहित शेट्टी उर्फ अकबर पाशा असे अटक आरोपीचे नाव आहे. त्याने आपले साथीदार भगवान पवार, पल्लवी पवार, विठाबाई पवार आणि विनोद शेट्टी यांनी अंबरनाथ येथील आयुध निर्माण कारखान्यातील उपहारगृहाचे कंत्राट मिळवून देण्याचे आमिष तक्रारदार जगदीप दुबे याची फसवणुक केली.

सदर कंत्राट मिळावे म्हणून आरोपींनी दुबे यांच्याकडून ३२ लाख रुपये उकळले. दुबे यांच्या नावाने उपहारगृहाचे कंत्राट मंजूर झाल्याचा बनावट कार्यादेश दाखवून त्याचा विश्वास संपादीत केला.

प्रत्यक्षात कोणतेही कंत्राट मिळवून न देता त्यांच्या पैशांचा अपहार करुन त्यांची फसवणूक केली. याप्रकरणी कासारवडवली पोलीस ठाण्यात ११ डिसेंबर रोजी तक्रार दाखल होती. दरम्यान, रोहित हा ठाण्यातील गोल्डन डाईज नाका येथे येणार असल्याची माहिती खंडणी विरोधी पथकास मिळाली. त्याच माहितीच्या आधारे सापळा रचून त्याना अटक करण्यात आली.