गळ्यातील एक तोळ्याच्या सोनसाखळीसाठी ‘त्याने’ केली मित्राची हत्या 

भिवंडी: तालुक्यातील मोहंडूल ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या करंजोटी गावातील आकाश शेलार(akash shelar) या कॉलेज युवकाला अज्ञात मारेकऱ्याने मोबाईलवरुन संपर्क करून गावालगतच्या माळरानावर बोलावून हात व डोक्यावर लाकडी बॅटने प्रहार करून शुक्रवारी सायंकाळी निर्घृण हत्या केल्याची घटना घडली होती.या हत्येप्रकरणी पडघा पोलीस ठाण्यात अज्ञात मारेकऱ्याविरोधात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या गुन्ह्याचा समांतर तपास स्थानिक पडघा पोलीस व ठाणे ग्रामीणच्या गुन्हे अन्वेषण पथकामार्फत सुरू होते.हत्या झालेल्या आकाश याच्या गळ्यातील एक तोळ्याची सोन्याची चेन व मोबाईल गायब असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.त्यामुळे ही हत्या सोन्याची चेन चोरीसाठी केली असावी असा अंदाज वर्तवून पोलिसांनी तपास सुरू केला होता. यावेळी गुन्हे शाखेच्या पोलिसांनी आकाश याचा मोबाईल सीडीआर तपासणीसाठी टाकला असता मोबाईल लोकेशन करंजोटी गावातच दाखवत असल्याचे दिसून आले.त्यानुसार पोलिसांनी कसून शोध घेतला असता गावातील मयुर  जाधव याच्या घरात आढळून आला. त्यामुळे स्थानिक ठाणे ग्रामीण गुन्हे शाखेचे एपीआय परशुराम लोंढे ,पोलीस उपनिरीक्षक गणपत सुळे आदींच्या पोलीस पथकाने मयुर यास शनिवारी मध्यरात्री ताब्यात घेऊन त्याच्याकडे कसून चौकशी केली असता त्याने मित्र आकाश शेलार याच्या गळ्यातील सोन्याची चेन चोरण्यासाठी त्याला माळरानावर बोलावून बॅटच्या सहाय्याने डोक्यावर ,हातावर ,मानेवर प्रहार करून त्याला ठार मारले तसेच गळ्यातील चेन काढून घरात आणून ठेवली आहे,अशी कबुली  दिली.

सोन्याची चेन घराच्या पोटमाळ्यावर ठेवली होती. ती  पोलिसांना स्वाधीन करण्यात आली आहे. मयुर याने मित्राची हत्या केल्याची कबुली दिल्यानंतर त्यास ताब्यात घेऊन जप्त केलेली सोन्याची चेन व मोबाईल गुन्हे शाखेच्या पोलिसांनी पडघा पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.पडघा पोलीस ठाण्याचे एपीआय पवन चौधरी यांनी खूनी मयुर जाधव यास अटक करून रविवारी भिवंडी न्यायालयात हजर केले असता त्यास २० सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.