मुसळधार पावसाचा पालघर महावितरण विभागलाही फटका

पालघर: मंगळवारी पालघर जिल्ह्यातल्या (Palghar District)अनेक भागांत झालेल्या मुसळधार पावसाचा फटका पालघर महावितरण ( MSEDCL) विभागाला ही बसला. मुसळधार पावसामुळे पालघर महावितरण विभागात एकूण  ५५  वीज वाहिन्यांमध्ये तांत्रिक बिघाड होऊन २४९०००  ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित झाला होता. पाऊस आणि वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी झाडं वीज वाहिन्या वर पडल्यानं महावितरण चे लघु दाब वाहिनीचे १६ पोलचं नुकसान झालं. तर उच्च दाब वहिनीचे पोल आणि वीज रोहित्रांचे नुकसान झाल्याचं अद्याप पर्यंत निदर्शनास आलेलं नाही.

वीजपुरवठा खंडित झालेल्या ५५ वीज वाहिन्यां पैकी २७ वीज वाहिन्यांचा वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला असून उर्वरित २८ वीज वाहिन्यांचा वीज पुरवठा सुरू करण्याचं कामं युद्ध पातळीवर सुरू असल्याची माहिती महावितरण विभागाकडून देण्यात आली आहे. 

उर्वरित अंदाजे १४५००० ग्राहकांचा वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी महावितरणचे वरिष्ठ अधिकारी परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहेत.या नैसर्गिक आपत्तीत ग्राहकांनी सहकार्य करावे असं आवाहन महावितरण कडून करण्यात आलं आहे.