गणेशोत्सवाचा खर्च टाळून मुख्यमंत्री सहाय्यता निधीला मदत

कल्याण मधील यादव कुटुंबियांनी जपले सामाजिक भान

कल्याण :  यंदा कोरोनाच्या सावटामुळे सर्वच सण उत्सव साधेपणाने साजरे करण्यात येत आहेत. अशातच सुरु झालेला गणेशोत्सवाचा खर्च टाळून हि रक्कम कोविड मुख्यमंत्री सहाय्यता निधीला मदत म्हणून देत कल्याण मधील हरीश्चंद्र यादव कुटुंबियांनी सर्वांसमोर आदर्श निर्माण केला आहे.

गणेशोत्सव म्हंटलं कि मूर्ती, डेकोरेशन, गणपती आगमन विसर्जन मिरवणूक, महाप्रसाद आदींच्या माध्यमातून गणेशभक्त यथाशक्ती खर्च करत असतात. कल्याण पश्चिमेतील बेतूरकर पाडा येथे राहणारे हरीश्चंद्र यादव हे कुटुंबीय देखील दरवर्षी लाडक्या बाप्पाला आपल्या घरी आणून पूजा अर्चा करत असतात. मात्र यंदा कोरोनाचे सावट लक्षात घेता सामजिक भान जपत अत्यंत साधेपणाने उत्सव साजरा करत गणेशोत्सवाला होणारा खर्च टाळत हा खर्च कोविड मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार त्यांनी २५ हजारांची रक्कम मुख्यमंत्री सहाय्यता निधीला दिली आहे.

यादव कुटुंबीयांनी गणरायाची मूर्ती देखील शाडूच्याच्या मातीची बनवली असून हि मूर्ती घरच्या घरीच शेजारी समीर गिरी या मूर्तीकाराने साकारली आहे. त्यामुळे तो खर्च देखील वाचला असून या मूर्तीमध्ये झाडांच्या बिया टाकल्या असून या मूर्तीचे घरीच विसर्जन करण्यात येणार आहे. एकंदरीतच पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करत त्यातून देखील मुख्यमंत्री सहाय्यता निधीला मदत करत यादव कुटुंबियांनी आदर्श गणेशोत्सव साजरा केला आहे.