अबब ! तब्बल १६ लाखांची घरफोडी

भिवंडी : भिवंडी(bhivandi) शहरात कोरोना काळात गुन्हे(crime) आटोक्यात आले असतानाच गुन्हेगारीने पुन्हा डोके वर काढले असून २५ ऑगस्ट रोजी भरदिवसा नारपोली पोलीस ठाणे क्षेत्रात झालेल्या घरफोडीत तब्बल ९ लाख ७० हजार रुपयांचे १९ तोळे सोन्याचे दागिने(jewelry) व ६ लाख ४० हजार रुपयांचा(cash) मुद्देमाल चोरीस गेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे .

अंजुरफाटा येथील चंदनपार्क या इमारतीमध्ये राहणारे अनिल राठोड हे कुटुंबियांसह राहत असून २५ ऑगस्ट रोजी नेहमीप्रमाणे ते आपल्या हॉटेलवर तर पत्नी कामावर घर बंद करून गेली असता दुपारी साडेबारा ते एक वाजताच्या सुमारास त्यांच्या फ्लॅटचा कडीकोयंडा उचकटून चोरटे आत शिरले. चोरट्यांनी घरातील कपाटाच्या लॉकरमधील  १९ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने ज्यामध्ये अंगठी,ब्रेसलेट,कर्णफुले,चैन,गंठन अशा दागिन्यांचा समावेश होता ते चोरले. तसेच  त्यासोबत ६ लाख ४० हजार रोख रक्कम चोरी करून पोबारा केला आहे .

या प्रकरणी अनिल राठोड यांनी नारपोली पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. मात्र इमारती नजीकच्या सीसीटीव्हीमध्ये इमारतीमध्ये आलेल्या चोरट्यांचे चित्रण असताना पोलिसांनी अजून पर्यंत आरोपींना अटक केली नसल्याने अनिल राठोड यांनी चिंता व्यक्त केली आहे. पोलिसांनी गुन्हेगारांना तात्काळ अटक करून आम्हा कष्टकरी कुटुंबियांचा मुद्देमाल तात्काळ मिळवून द्यावा, अशी मागणी अनिल राठोड यांनी केली आहे .