ठाण्यात पुन्हा ‘दम मारो दम’,अनधिकृत हुक्का पार्लरचे वाढते प्रस्थ – कारवाई करण्याच्या आयुक्तांच्या आदेशाला हरताळ

सुसंस्कृत ठाणे शहरात(thane city) अनेक ठिकाणी दिवसाढवळ्या हुक्का पार्लर(illegal hukkah bar) तसेच बार अनधिकृतपणे(illegal bar) सुरू असल्याची बाब समोर आली आहे.

ठाणे: सुसंस्कृत ठाणे शहरात(thane city) अनेक ठिकाणी दिवसाढवळ्या हुक्का पार्लर(illegal hukkah bar) तसेच बार अनधिकृतपणे(illegal bar) सुरू असल्याची बाब समोर आली आहे. काही दिवसांपूर्वी पालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी अवैध धंद्यावर कारवाई करा,असे आदेश सहाय्यक आयुक्तांनी दिले असताना सुद्धा थातुरमातुर कारवाई केली जात असल्याचा आरोप नगरसेवकांनी केला.

ठाणे शहराच्या विविध भागात अनाधिकृत बांधकामे उभी राहत आहेत. फेरीवाल्यांचे प्रस्थ वाढले आहे. असा सवाल शुक्रवारी झालेल्या महासभेत सर्व पक्षीय नगरसेवकांनी केला. तर कोरोना असतांनाही रात्रभर हुक्का पार्लर, बार सुरु असल्याची धक्कादायक बाबही यावेळी नगरसेवकांनी प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली. रात्री उशीरापर्यंत सुरु असलेल्या बार, हुक्का पार्लरवर कारवाई झालीच पाहिजे, अनधिकृत बांधकामे आणि फेरीवाल्यांवर कारवाई करावी,असेआदेश महापौर नरेश म्हस्के यांनी प्रशासनाला दिले.

ठाणे शहरात गेल्या काही महिन्यांपासून अनधिकृत बांधकामे शहरात होऊ लागली आहेत. तसेच शहरातील रस्त्यांवर फेरीवाल्यांचेही प्रस्थ वाढले आहे. अशावेळी त्यावर कारवाई करावी असे प्रभाग समितींच्या सहाय्यक आयुक्तांना सांगितले असता, आम्हाला सौम्य कारवाई करा असे आदेश असल्याचे त्यांना सांगितले जाते, तर त्यांना या सुचना कोणी दिल्या आहेत, असा सवाल नगरसेविका मीनल संखे यांनी केला. तर हाच मुद्दा धरुन मृणाल पेंडसे यांनी नौपाडा किंवा स्टेशन परिसरातही फेरीवाल्यांचे प्रस्थ वाढत असतांनाही त्यांच्यावर कारवाई होत नसून, सौम्य कारवाई केली जात आहे. त्यामुळे अधिकारी या फेरीवाले किंवा अनाधिकृत बांधकामांना पाठीशी घालत आहे का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. अनाधिकृत बांधकामे तर वाढत आहेतच, शिवाय शहरात रात्रीचे हुक्का पार्लर, बार राजरोसपणो सुरु असल्याची माहिती नगरसेवक भरत चव्हाण यांनी दिली. त्यांच्यावर का कारवाई होत नाही, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. तर या संदर्भात एक समिती नेमण्यात यावी अशी मागणी नगरसेवक राम रेपाळे यांनी केली. परंतु समिती स्थापन करुन उलट नगरसेवकच त्यात बदनाम होतात, त्याऐवजी शासनाचा जो काही आध्यादेश आहे, त्यानुसार पालिकेने नव्याने उभ्या राहिलेल्या अनधिकृत बांधकामांची माहिती घेऊन सभागृहासमोर आणावी,अशी मागणी नगरसेवक हणमंत जगदाळे यांनी केली.

दरम्यान या संदर्भात अतिक्रमण उपायुक्त अशोक बुरपुल्ले यांनी सहाय्यक आयुक्तांना तसे कोणत्याही स्वरुपाचे आदेश देण्यात आलेले नाहीत. तक्रारी आल्यानंतर तत्काळ कारवाई करण्याच्या सुचना देण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. दुसरीकडे महापौर नरेश म्हस्के यांनी शहरात रात्रीच्या सुमारास जे काही बार, हुक्का पार्लर सुरु आहेत, त्यांच्यावर तत्काळ कारवाई करण्यात यावी, तसेच अनाधिकृत बांधकामे किंवा फेरीवाल्यांच्या बाबत तक्रारी आल्या तर त्यांच्यावर देखील तात्काळ कारवाई करण्यात यावी असे आदेश त्यांनी यावेळी दिले.

काही दिवसांपूर्वी आयुक्तांनी दिले होते आदेश
ठाणे महापालिका आयुक्त डॉ.विपिन शर्मा यांनी शहरातील अनधिकृत हॉटेल्सची बांधकामे, बार, हुक्का पार्लरवर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्या नंतर माजिवडा मानपाडा प्रभाग समितीमधील नागला बंदर, रेतीबंदर जी.बी. रोड येथील हुक्का पार्लर तसेच अनधिकृत हॉटेल्सवर धडक कारवाई करून शेडचे बांधकाम निष्कासित करण्यात आले. मात्र हे वरवरची तोडक कारवाई करून पुन्हा आतमध्ये हुक्का,बार सुरूच असताना त्यामुळे ही धडक कारवाई का केली जात नाही असा सवाल उपस्थित झाला आहे.