कल्याणमध्ये भक्तिभावात गणरायाचे विसर्जन, आयुक्तांनी केली विसर्जन स्थळांची पाहणी

दुर्गाडी येथील गणेश घाटावर दरवर्षी पेक्षा कमी गर्दी दिसून आली दिवसभरात सुमारे सहा हजार हुन अधिक बाप्पांचे विसर्जन करण्यात आले. गणेश घाटावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता तर पालिकेच्या कर्मचारी अधिकार्यांची फौज देखील घाटावर तैनात करण्यात आली होती.

कल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिका परिसरातील विविध विसर्जन स्थळांवर (Visarjan Ghat), कृत्रिम तलावात (In the artificial pond) काल अनंत चतुर्दशीच्या दिवशी सुमारे ५८७५ श्री गणेश मुर्तींचे विसर्जन शांततामय वातावरणात पार पडले. महापालिका क्षेत्रातील प्रमुख विसर्जन स्थळ असलेल्या दुर्गाडी येथील गणेश घाटावर महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी सायंकाळी भेट देवून पाहणी केली. तसेच गणेश घाटावर उभ्या असलेल्या नौकेतून फेरफटका मारुन एकंदर परिस्थितीचा आढावा घेतला. तसेच गणेश घाटावर उपस्थित असलेल्या कोळी बांधवांच्या समस्या जाणून घेतल्या व त्या दूर करण्याबाबत त्यांना आश्वासन दिले.

दुर्गाडी येथील गणेश घाटावर दरवर्षी पेक्षा कमी गर्दी दिसून आली दिवसभरात सुमारे सहा हजार हुन अधिक बाप्पांचे विसर्जन करण्यात आले. गणेश घाटावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता तर पालिकेच्या कर्मचारी अधिकार्यांची फौज देखील घाटावर तैनात करण्यात आली होती. तर खडकपाडा पोलीस स्थानकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक पवार यांनी चक्क माईक हाती घेऊन भक्ती गीते गायली.

कोविड साथीच्या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन महापालिका क्षेत्रातील नागरिकांनी गर्दी न करता शांततामय वातावरणात गणेश उत्सव पार पाडल्याबाबत महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी नागरिकांचे व गणेश मंडळांचे आभार मानले. गणेशोत्सवाच्या काळात सहकार्य केल्याबाबत लोकप्रतिनिधींचेही त्यांनी आभार मानले. यावेळी पालिका शहर अभियंता सपना कोळी-देवनपल्ली, इंडियन मेडिकल असोशिएशनचे सेक्रेटरी डॉ. प्रशांत पाटील, कार्यकारी अभियंता सुभाष पाटील, क प्रभागक्षेत्र अधिकारी भागाजी भांगरे त्‍यांचे समवेत‍ उपस्थित होते.