लव्ह, लग्न, लोचा : भिवंडीत घटस्फोट देत नाही म्हणून पत्नीनेच केला प्रियकराच्या मदतीने नवऱ्याचा खून

आरोपी महिलेचे विवाहबाह्य संबंध असल्याने तीला प्रियकरासोबत लग्न करण्यासाठी पतीकडून टस्फोट हवा होता. मात्र, तो घटस्फोट देत नसल्याने रागातून प्रियकर व मैत्रिणीच्या मदतीने कट रचला व पतीचा काटा काढला.

    मानकोली नाका येथे ओला कार चालकाची गळा आवळून हत्या केल्याची घटना १ ऑगष्ट रोजी उघडकीस आली. या घटनेनंतर पत्नीच्या फिर्यादी वरून नारपोली पोलिसांत हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र, पोलीस तपासात खुद्द फिर्यादी पत्नीच या हत्येच्या गुन्ह्यात मुख्य आरोपी असल्याचे निष्पन्न झाले आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी महिलेचे विवाहबाह्य संबंध असल्याने तीला प्रियकरासोबत लग्न करण्यासाठी पतीकडून टस्फोट हवा होता. मात्र, तो घटस्फोट देत नसल्याने रागातून प्रियकर व मैत्रिणीच्या मदतीने कट रचला व पतीचा काटा काढला.

    या महिलेने आपल्या नवऱ्याचा खुन करण्यासाठी प्रियकर व मैत्रिणीला एक लाख रुपयांची सुपारी दिल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे.

    प्रभाकर पांडू गंजी असे हत्या झालेल्या कार चालकाचे नाव असून श्रुती गंजी आरोपी महिलेचं नाव आहे. मयत प्रभाकर व आरोपी श्रुती या दोघांचेही बाहेर विवाहबाह्य समंध होते. त्यामुळे श्रुतीने आपला प्रियकर नितेश सोबत लग्न करण्यासाठी प्रभाकरकडे घटस्फोटा साठी तगादा लावला होता.

    मैत्रीणीने दिला काटा काढण्याचा सल्ला

    प्रभाकर घटस्फोट देत नसल्याचं श्रुतीने आपली मैत्रीण प्रिया निकमला सांगीतलं. प्रियाचा सुध्दा घटस्फोट झाला असल्याने तिने श्रुतीला पतीची हत्या करण्याचा सल्ला दिला. त्यासाठी आपल्या ओळखीचे दोन युवक असल्याचे सांगितले. त्यांनतर श्रुतीने दागिने गहाण ठेवून एक लाख रुपयांची सुपारी हत्या करणाऱ्या दोघा जणांना दिली.

    असा काढला काटा..

    श्रुती, नितेश, प्रिया तिघांच्या सांगण्यानुसार सुपारी किलरनी ३१ ऑगष्टच्या रात्री मुंबईला जाण्यासाठी प्रभाकरला फोन करून रात्री दहा वाजता कार बुक केली. गाडी मानकोली येथे आल्यावर मारेकऱ्यांनी गळा आवळून प्रभाकरची हत्या केली व शव कार मध्येच ठेवून पसार झाले.

    असा झाला गुन्ह्याचा उलगडा

    या गुन्ह्याचा तपास नारपोली पोलीस व गुन्हे शाखा ठाणे हे एकत्रित करीत असताना तांत्रिक तपासाच्या आधारे या गुन्ह्यात तक्रार देणारी पत्नी श्रुती हीच या गुन्ह्यातील मुख्य आरोपी असल्याचे तपासात उघड झाले. सध्या पोलीसांनी प्रियकर नितेश व मैत्रीण प्रिया या तिघांना अटक केली असून हत्या करणारे दोघे जण फरार आहेत. अशी माहिती नारपोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मालोजी शिंदे यांनी दिली आहे.