लसींच्या अपुऱ्या साठ्यामुळे आरोग्य व जम्बो कोविड केंद्रातील लसीकरण थांबले; नवी मुंबईतील प्रकार

नवी मुंबई महापालिका क्षेत्रात लसीकरणाने वेग पकडला आहे. पहिला व दुसरा डोस मिळून जवळपास दीड लाखांपेक्षा जास्त नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. पालिकेकडून केल्या जाणाऱ्या जनजागृतीमुळे नागरिक देखील लसीकरण करून घेत आहेत.

    नवी मुंबई : राज्यात लसींचा अपुरा साठा मिळत असल्याची ओरड होत असल्याचे परिणाम स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये देखील पाहायल मिळाले. नवी मुंबई महापालिकेने १९ आरोग्य केंद्रांमध्ये व जम्बो लसीकरण केंद्रात सुरू केलेले लसीकरण अपुऱ्या साठ्यामुळे गुरुवारी बंद ठेवावे लागल्याचे समोर आले आहे. मुख्य म्हणजे खासगी रुग्णालयांसह वाशी, ऐरोली, तुर्भे व नेरूळ येथील रुग्णालयांमध्ये लसीकरण सुरू ठेवण्यात आले होते. त्यामुळे शुक्रवारी तरी आरोग्य केंद्रांतील लसीकरण सुरू राहणार का ते पाहावे लागणार आहे.

    नवी मुंबई महापालिका क्षेत्रात लसीकरणाने वेग पकडला आहे. पहिला व दुसरा डोस मिळून जवळपास दीड लाखांपेक्षा जास्त नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. पालिकेकडून केल्या जाणाऱ्या जनजागृतीमुळे नागरिक देखील लसीकरण करून घेत आहेत. त्यासाठी पालिका व खासगी रुग्णालये व आरोग्य केंद्रांत रांगा लावून उभे असलेले पाहायल मिळत आहेत. नेरुळ, ऐरोली, वाशी रुग्णालयात पालिकेचे २४ तास लसीकरण सुरू आहे. तर जम्बो कोविड केंद्र, तुर्भे रुग्णालय व १९ आरोग्य केंद्रात लसीकरण मोहीम रुग्णालयीन वेळेत सुरू आहे. १४ खासगी रुग्णालयांत देखील रुग्णालयीन वेळेत लसीकरण सुरू आहे.

    गेल्या काही दिवसांपासून राज्यावर लसींच्या डोसांबाबत अन्याय होत असल्याची ओरड मविआकडून होऊ लागली आहे. तर केंद्राकडून मात्र राज्याचे नियोजन चुकत असल्याची टीका केली जात आहे. केंद्राच्या व राज्याच्या वादात मात्र सामान्य नागरिक भरडले जात आहेत. स्थानिक स्वराज संस्थांमध्ये देखील हा वाद उफाळून येऊ लागला आहे.

    आमदार गणेश नाईकांनी राज्यावर नवी मुंबई महापालिकेला ठाणे, कल्याण-डोंबिवलीच्या तुलनेत कमी लसी मिळाल्याची टीका केली आहे. ते काहीसे खरे ठरत असल्याचे नवी मुंबईत गुरुवार दि.८ एप्रिल रोजी पाहण्यास मिळाले. नवी मुंबईतील १९ आरोग्य केंद्रांतील लसीकरण गुरुवारी थांबवण्याचा निर्णय घेत, शहरातील २४ तास सुरू असलेल्या ऐरोली, नेरुळ व वाशी या तीन रुग्णालयांत व तुर्भे येथील रुग्णालयात हलवण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.

    मुख्य म्हणजे पालिकेने ईएसआयसी येथे सुरू केलेले जम्बो कोविड केंद्रातील चारही उपकेंद्रे देखील पालिकेला अपुऱ्या लसींच्या साठ्यामुळे बंद ठेवावी लागली. त्यामुळे वेगात लसीकरण करण्याच्या नवी मुंबई महापालिकेच्या प्रयत्नांना खीळ बसली आहे. त्यामुळे आज (शुक्रवारी) काय होते. लसींचा पुरेसा साठा नवी मुंबईला मिळतो का? व लसीकरण केंद्रे सुरू होऊन सुटसुटीतपणे गर्दी टाळत नागरिकांना लस घेता येते का ते देखील पाहावे लागणार आहे.