प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो

सीबीडी आरोग्य केंद्रातील बाह्य बाजूस वॉश बेसिन लावलेले आहे. याचा वापर आरोग्य कर्मचाऱ्यांसह रुग्ण देखील करताना दिसतात. मात्र याच पाण्याचा वापर हा स्टॉल धारक खाद्यपदार्थांसाठी करत होता. जाड ड्रम भरावा लागत असल्याने वर उचलून धरणे शक्य नसल्याने वॉश बेसिनच्या खालचा पाईप काढून त्यातून हा ड्रम भरला जात असल्याची किळसवाणी बाब समोर आली आहे.

    नवी मुंबई : सीबीडी बेलापूर सेक्टर २ येथील सुनील गावस्कर मदैनाशेजारी असलेल्या खाद्य पदार्थ बनवण्यासाठी शेजारी असलेल्या आरोग्य केंद्रातील वॉश बेसिनचा पाईप काढून गलिच्छ पाणी वापरले जात असल्याचा धक्कादायक व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे. या घटनेने बेलापूर वासियांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. मुख्य म्हणजे ज्या आरोग्य केंद्रातील वॉश बेसिनच्या पाण्याचा वापर या स्टॉलधारकाकडून करण्यात येत होता, “त्याच आरोग्य केंद्रातील अधिकारी कर्मचारी याच स्टॉलवरून चहा, खाद्यपदार्थ घेत असल्याने सर्वच जण धास्तावले आहेत.

    सीबीडी आरोग्य केंद्रातील बाह्य बाजूस वॉश बेसिन लावलेले आहे. याचा वापर आरोग्य कर्मचाऱ्यांसह रुग्ण देखील करताना दिसतात. मात्र याच पाण्याचा वापर हा स्टॉल धारक खाद्यपदार्थांसाठी करत होता. जाड ड्रम भरावा लागत असल्याने वर उचलून धरणे शक्य नसल्याने वॉश बेसिनच्या खालचा पाईप काढून त्यातून हा ड्रम भरला जात असल्याची किळसवाणी बाब समोर आली आहे. त्यामुळे बेलापूरमधील नागरिक चांगलेच खवळले असून, हा व्हिडिओ व्हायरल होताच, नागरिकांनी या दुकानदारास जाब विचारात चोप दिला आहे.

    या घटनेने घाबरून दुकानदार दुकान बंद करून पळून गेला आहे. सिडकोने दिव्यांगांना रोजगार मिळावा म्हणून हे स्टॉल व्यवसायासाठी दिले आहे. मात्र दिव्यांगांकडून अनेकदा हे स्टॉल भाड्याने दिले जातात. अशाच प्रकारे हा स्टॉल संबंधित दुकानदाराला भाड्याने देण्यात आल्याचे समजते. नियमितपणे या स्टॉलवरून खाद्यपदार्थ व चहा पिणारे नागरिक मात्र या घटनेने हादरले असून, गलिच्छ पाण्याचा वापर खाद्यपदार्थासाठी करणाऱ्या व नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या या दुकानदारांवर कठोर कारवाई करावी व गुन्हा दाखल करावा मागणी विभाग अधिकाऱ्यांकडे केली जात आहे.

    पालिकेकडून सर्व आरोग्य केंद्रात सध्या कोविड टेस्टिंग व लसीकरण करण्यात येत आहे. त्याशिवाय अनेक रुग्ण हे आजारांवर उपचारांसाठी येत असतात. या नागरिक आरोगय केंद्राच्या बाह्य बाजूस असलेल्या वॉशबेसिनचा वापर हात, तोंड धुणे, अथवा चूळ भरण्यासाठी केला जात आहे. मात्र याच बेसिनचा पाईप काढून जिथून पाणी सांडण्याच्या टाकीत सोडण्यासाठी पाईप जोडला जातो. तो पाईप काढून बेसिनमधून खाली झिरपणारे पाणी ड्रममध्ये भरून अन्नपदार्थ शिजवले जात असल्याचे या घटनेतून उघड झाले आहे. त्यामुळे नागरिक व आरोग्य कर्मचारी देखील भयभीत झाले आहेत.

    हा व्हिडिओ व्हायरल होताच या किळसवाण्या प्रकाराने नागरिक संतापले आहेत. आम्ही देखील या स्टॉलवरून खाद्यपदार्थ अथवा चहा घ्यायचो. मात्र खाद्यपदार्थांसाठी लागणारे पाणी हा दुकानदार आणतो कुठून याबाबत आम्ही कधीच विचारणा केली नाही. सध्या कोविडचा काळ सुरू आहे. त्यात आरोग्य केंद्रात कोविड पेशंट येत असतात, आरोग्य कर्मचारी हात धूत असतात, असे स्पर्श झालेल्या वॉश बेसिनच्या पाईपमधून जणाऱ्या भागातून हे पाणी जात असल्याने सर्वजण भयभीत झाले आहेत. या भागातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात टाकणाऱ्या दुकानदारावर पालिकेने व पोलिसांनी कडक कारवाई करावी.

    एजाज खान, नागरिक, सीबीडी, बेलापूर