त्या… १५ मृत बगळ्यापैकी ५ बगळ्यांचा मृत्यू बर्डफ्लूने झाल्याचे स्पष्ट ; ठाण्यात कोरोनानंतर आता बर्डफ्लूची दहशत – पालिकेनेही घेतली दखल

राज्यांमध्ये बर्ड फ्लूची साथ आली आहे. या पार्श्वभूमीवर ठाणे महानगरपालिकेने सतर्ककतेचा उपाय म्हणून नियंत्रण कक्ष निर्माण केला आहे. या साथीमुळे नागरिकांनी घाबरून न जाता मृत झालेल्या पक्ष्यांची माहिती तात्काळ नियंत्रण कक्षास देण्याचे आवाहन महापौर आणि महापालिका आयुक्त यांनी केले आहे.

ठाणे: ठाण्यात कोरोनाचा धोका आद्यपही संपलेला नसतानाच नव्या बर्डफ्लूचा धोका वाढलेला असल्याचे चित्र दिसत असल्याने ठाणेकरांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. संपर्काने कोरोनाची लागण होत आहे तर आता दुसरीकडे पक्षांच्या माध्यमातूनही धोका निर्माण झाल्याने ठाणेकरांवर रोगराईचे टांगती तलवार लटकत आहे. चार दिवसापूर्वी ठाणे पालिकेच्या हद्दीत खाडी किनाऱ्यावर तब्बल १५ बगळे आणि पानबगळे मृत पावले होते. अचानक ठाण्यात बगळे आणि पानबगळे यांचा मृत्यू झाल्याने त्यांची तपासणी करण्यासाठी पुण्याच्या वैद्यकीय शाळेत पाठविण्यात आले होते. त्यांचा रिपोर्ट हा पॉझिटिव्ह आल्याने एकच खळबळ उडालेली आहे. वैद्यकीय शाळेच्या आवाहालानुसार पाच बगळे हे पॉझिटिव्ह आल्याचे समजते. तर दुसरीकडे याची दाखल पालिकेनेही घेतल्याचे चित्र समोर आले आहे. पालिका आयुक्त आणि महापौर यांनी ठाणेकरांना घाबरून न जाण्याचा दिलासा दिला आहे. बर्डफ्लूचा धोका परभणी, ठाणे, दापोली आणि बीड परिसरात वाढल्याचे चित्र आहे.

चिकनच्या व्यवसायावर संक्रांत
बर्डफ्लूच्या धसक्याने पुन्हा एकदा नागरिक चिकनच्या सेवनापासून दूर पळू लागले आहेत. त्यामुळे चिकनच्या व्यावसायिकांवर संक्रात येण्याची चिन्हे आहेत. परभणीत ८०० कोंबड्या बर्डफ्लूने मेल्याचे वृत्त वाऱ्यासारखे पसरल्याने आता महाराष्ट्रात पोल्ट्रीफॉर्मच्या व्यवसायावरही परिणाम होणार असलयाचे चित्र दिसत आहे.

ठाणे पालिकेचा बर्डफ्लूसाठी नियंत्रण कक्ष-मृत पक्षाची माहिती द्या
बर्ड फ्लूमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होवू नये तसेच नागरिकांना योग्य माहिती मिळावी यासाठी ठाणे महानगरपालिकेच्यावतीने नियंत्रण कक्ष स्थापन केला असल्याची माहिती पालिका महापौर आणि पालिका आयुक्त यांनी दिले. राज्यांमध्ये बर्ड फ्लूची साथ आली आहे. या पार्श्वभूमीवर ठाणे महानगरपालिकेने सतर्ककतेचा उपाय म्हणून नियंत्रण कक्ष निर्माण केला आहे. या साथीमुळे नागरिकांनी घाबरून न जाता मृत झालेल्या पक्ष्यांची माहिती तात्काळ नियंत्रण कक्षास देण्याचे आवाहन महापौर आणि महापालिका आयुक्त यांनी केले आहे. ठाणे महानगरपालिकेच्या पशुवैद्यकीय अधिकाऱ्याच्या निगरानीखाली हा नियंत्रण स्थापन केला असून नागरिकांनी प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन कक्ष येथील टोल फ़्री -1800 222 108 तसेच 022 -25371010 या हेल्पलाईनवर माहिती द्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.

आज ठाण्यात मृत कावळा आढळला
बर्ड फ्लूची ठाण्यात वाढती दहशत आणि पालिका प्रशासनाने सुरु केलेला नियंत्रण कक्ष आणि सोमवारीच ठाण्याच्या हिरानंदानी या उच्चभू वस्तीत चेलसा सोसायटी हिरानंदानी येथे एक कावळा मृतावस्थेत पडलेला आढळला. त्यामुळे ठाण्यात भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे. ठाणे पालिकेच्या बर्डफ्लू नियंत्रण कक्षात पहिली नोंद मृत कावळ्याची झालेली आहे.