tilgul

कोरोनाच्या(corona) लाटेत सण विसरलेल्या नागरिकांच्या नव्या वर्षाच्या नव्या अपेक्षेप्रमाणे यंदा नव्या वर्षातला मकर संक्रांतीचा सणही महागाईच्या(inflation) चटक्यात आणि आर्थिक चणचणीत साजरा करावा लागणार असेच चित्र दिसत आहे.

ठाणे : कोरोनाच्या लाटेत सण विसरलेल्या नागरिकांच्या नव्या वर्षाच्या नव्या अपेक्षेप्रमाणे यंदा नव्या वर्षातला मकर संक्रांतीचा सणही महागाईच्या(inflation) चटक्यात आणि आर्थिक चणचणीत साजरा करावा लागणार असेच चित्र दिसत आहे. मकर संक्रांतीच्या(makar sankrant) सणाला महागाईची झळ पोहचणार असल्याने संक्रांतीच्या गोडव्यात गोडवा कमी होणार आहे. यंदा साखरेचे भाव स्थिर असले तरीही गुळ आणि तिळाचे भाव मात्र वाढलेले आहेत. त्यामुळे संक्रांतीचा गोडवा कमी होणार असे चित्र आहे.

मकरसंक्रांत म्हटली की तीळगुळाशिवाय कोणताच पदार्थ होत नाही. त्यामुळे तीळगुळ लागतोच. मात्र त्याचे वाढलेले दर पाहता यंदा सण जरा आवरता घ्यावा लागेल. प्रत्येक वर्षी संक्रांतीत तीळगुळ आणि तिळाचे लाडू यांचा वापर मोठ्या प्रमाणात असतो. महिलांचे हळदीकुंकू असते. मात्र तीळ आणि गुळाचे भाव वाढल्याने गृहिणींना कसरत करावी लागणार आहे.

- दिव्याक्षी मांडवकर, गृहिणी ठाणे

कोरोनाची लोकांच्या मनातील भीती आता हळूहळू कमी होत आहे. त्यातच नवे वर्ष नव्या आशा, अपेक्षा घेऊन आले आहे. या नव्या वर्षाचा पहिला सण मकरसंक्रांत अगदी २-३  दिवसांवर आला आहे. त्यासाठी मोठ्या प्रमाणात खरेदी सुरु झालेली नसली तरी गुळ, साखर, तील आणि अन्य वस्तू बाजारात विक्रीसाठी आल्या असून साखर वगळता इतर वस्तूेचे दर वाढलेले आहेत. त्यामुळे यंदा संक्रांतीचा गोडवा कमी होण्याची शक्यता आहे.

साखरेचे भाव वगळता तीळगुळाचे दर वाढले आहेत. अजून महिलावर्गाकडून फारशी मागणी सुरु झालेली नाही. वाढते दर पाहता तीळगुळासाठी ग्राहक किती येतील, याची खात्री नाही. कारण नुकतेच लोक कोरोनाच्या फटक्यातून सावरत आहेत. त्यात महागाई वाढल्याने आणि तीळगुळाचे भाव वाढल्याने ग्राहकांचा तेवढा चांगला प्रतिसाद यंदा नाही.

- देवीदास चौहान, किराणा दुकानदार, ठाणे

महिलांना  हळदी कुंकू आणि तिळगुळाची आवड असते. या तिळगुळाची बाजारात विक्री सुरू झाली त्याच्या दरातही वाढ झाली आहे. साखरेचे भाव गेल्या महिन्याइतके स्थिर असून तीळगुळाच्या दरामध्ये २० ते ४० रुपयांची वाढ झाली आहे. तिळाचेही विविध प्रकार आहेत. लाडू आणि चिक्कीसाठी पॉलिश केलेला तीळाचा वापर करतात. त्याचा दर २५०-२६० प्रति किलो आहे. सध्या तीळाचे दर हे २०० ते २१० प्रति किलो आहेत. लाडू, चिक्की बनविण्यासाठी लागणारा गूळ मात्र महागला आहे. साधा गुळ ७० ते ८० रुपये प्रति किलो आहे. चिक्कीचा गूळ ८० ते १०० रुपये किलो आहे. साखरेचे भाव मात्र गेल्या महिन्यापासून स्थिर आहेत. ४० ते ४२ रुपये प्रती किलो दर आहे.