ठाणे कारागृहातून पॅरोलवर सोडण्यात आलेल्या जव्हार भागातील कैद्याला कोरोनाची लागण

वाडा: पालघर जिल्ह्यातील जव्हार या आदिवासी बहुल तालुक्यातील एना गावातील बरफ पाडा येथील एका ३० वर्षीय पुरुषाचा कोरोना पॉझिटिव्ह रिपोर्ट आल्याने जव्हार तालुक्यातील एकुण रुग्ण संख्याही २ वर गेली आहे.हा

वाडा: पालघर जिल्ह्यातील जव्हार या आदिवासी बहुल तालुक्यातील एना गावातील बरफ पाडा येथील एका ३० वर्षीय पुरुषाचा कोरोना पॉझिटिव्ह रिपोर्ट आल्याने जव्हार तालुक्यातील एकुण रुग्ण संख्याही २ वर गेली आहे.हा रुग्ण ठाणे कारागृहात कैदी होता. तो दरम्यानच्या काळात पॅरोलवर तो घरी आला होता.त्याचा दोन दिवसांपूर्वी कोरोना चाचणीसाठी स्वॅब घेण्यात आला होता. त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे, अशी माहिती  जिल्हा शैल्यचिकित्सक कांचन वानेरे यांनी दिली. त्याचप्रमाणे आज सकाळी १० वाजेपर्यंत पालघर जिल्ह्यातील एकूण आज ६ नवे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे पालघर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील एकुण संख्या १०९ झाली आहे.

पालघर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील कोरोना रुग्णाने शंभरी पार केली आहे. दिवसाआडून ग्रामीण भागात दोन चार असे रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे पालघर जिल्ह्यातील ग्रामीण क्षेत्रातील वसई,वाडा,डहाणू, पालघर, जव्हार या भागात रुग्णसंख्या वाढत आहे. पालघर जिल्ह्यातील जव्हार शहरात पहिला रूग्ण आढळून आला त्यांनतर जव्हार शहरापासून १५ किलोमीटर दरम्यानच्या अंतरावर असलेल्या गाव पाड्यात हा रुग्ण आढळलेला आहे. त्याच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध चालू असून तो राहत असलेल्या परिसरातील  रुग्णांच्या संपर्कातील ४ जणांना क्वारंटाईन करण्यात येत असून रुग्णाला टिमा येथे हलविण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा आरोग्य विभाामार्फत देण्यात आली आहे. तर कैदी पॅरोलवर सुट्टी वर आल्याने तो जात असताना तो आपल्या वाडा तालुक्यातील देवळी मनिवली या ठिकाणी राहत असलेल्या बहिणीकडे गेला होता.त्यामुळे त्याच्या संपर्कातील तेथील ८ जण हायरिस्क म्हणून त्यांनाही आरोग्य विभागाने वाडा तालुक्यातील एका ठिकाणी संस्थात्मक देखरेखीखाली ठेवण्यात आल्याची माहिती वाडा तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ संजय बुरपुले यांनी दिली.