jayjeet singh

जयजीत सिंह(Jayjeet singh) यांच्या ठाणे पोलीस आयुक्त(Thane police Commissioner) पदाच्या नियुक्तीवरून शिवसेना(Shivsena) आणि राष्ट्रवादीच्या(Rashtravadi) मंत्र्यांचे एकमत झाल्याने या निर्णयावर शिक्कामोर्तब झाले आहे.

  ठाणे : ठाण्याचे माजी पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांच्या ४ मे च्या बढतीनंतर गेले तीन आठवडे रिक्त असलेल्या पोलीस आयुक्त पदी अखेर भारतीय पोलीस सेवेतील पोलीस अधिकारी  एटीएस प्रमुख जयजीत सिंह(Jayjeet Singh) यांच्या नियुक्तीचा मार्ग मोकळा झाला आहे.

  जयजीत सिंह यांच्या ठाणे पोलीस आयुक्त पदाच्या नियुक्तीवरून शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या मंत्र्यांचे एकमत झाल्याने या निर्णयावर शिक्कामोर्तब झाले आहे. जयजीत सिंह हे १९९० च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. त्यांच्या नियुक्तीचे पत्र येत्या दोन दिवसात निघण्याची शक्यता गृह विभागातून मिळाली आहे.

  गेल्या ऑक्टोबर महिन्यात झालेल्या आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये जय जीत सिंग यांची नियुक्ती लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या अतिरिक्त पोलीस महासंचालक पदावरून महाराष्ट्र राज्याच्या दहशतवाद विरोधी पथकाच्या प्रमुख पदी करण्यात आली होती. ४ मे रोजी ठाण्याचे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांना महासंचालक पदावर बढती देत त्यांची नियुक्ती महाराष्ट्र पोलिसांच्या गृहनिर्माण मंडळात करण्यात आली.

  तेव्हापासूनच महाराष्ट्र एटीएसचे प्रमुख असलेले जयजीत सिंह यांच्या नावाची चर्चा ठाणे पोलीस आयुक्त पदासाठी होत होती. तथापि जयजीत सिंह यांच्या नावाबाबत शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोन प्रमुख पक्षांमध्ये एकवाक्यता होत नव्हती.

  जयजीत यांच्याप्रमाणेच ठाणे पोलीस आयुक्त पदासाठी १९८९ च्या बॅचचे संजय कुमार आणि राजेंद्र सिंह यांच्या नावाचीही शिफारस होती. मात्र गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आणि ठाण्याचे पालकमंत्री, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्यामध्ये जयजीत सिंह यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याचे शिवसेनेच्या सूत्रांकडून समजते.

  आज शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या मंत्र्यांमध्ये चर्चा होऊन त्यानुसार ठाणे पोलीस आयुक्त पदासाठी ज्येष्ठ आयपीएस अधिकारी जयजीत सिंह यांच्या नावावर अखेर शिक्कामोर्तब करण्यात आले. त्यामुळे येत्या दोन दिवसातच जयजीत सिंह यांच्या नियुक्तीचे आदेश निघतील असे सांगण्यात येत आहे.