कल्याणमध्ये राज्य सरकारच्या विरोधात भाजपाचे निषेध आंदोलन

कल्याण : राज्य सरकार विरोधात भाजपने आज राज्यव्यापी आंदोलनाची हाक दिली असून कल्याणमध्ये भाजपा शहरअध्यक्ष प्रेमनाथ म्हात्रे यांनी नगरसेवक दया गायकवाड आणि कार्यकर्त्यासमवेत आंदोलन केले.

 कल्याण : राज्य सरकार विरोधात भाजपने आज राज्यव्यापी आंदोलनाची हाक दिली असून कल्याणमध्ये भाजपा शहर अध्यक्ष प्रेमनाथ म्हात्रे यांनी नगरसेवक दया गायकवाड आणि कार्यकर्त्यासमवेत आंदोलन केले. ‘आंगण ते रणांगण’ या शीर्षकाखाली राज्यातील अनेक भाजपा नेते आणि कार्यकर्ते आंदोलन करत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून राज्यात कोरोना संक्रमितांची वाढती संख्या, आरोग्य व्यवस्थेचा उडलेला बोजावारा आदींचा निषेध यावेळी करण्यात आला. यावेळी भाजपाच्या कार्यकर्त्यांनी काळे कपडे आणि काळा मास्क लावून सोशल डिस्टन्सिंगचे भान ठेवत आंदोलन करण्यात आले.   

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील कोणत्याच नागरिकाला एकही पैसा खर्च करावा लागणार नाही, अशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली होती. मात्र सरकारच्या नाकर्तेपणामुळे आजची परिस्थिती भीषण आहे. कोरोना टेस्टला देखील ४ ते ५ हजार रुपये आकारले जात असून, आता केवळ केशरी आणि पिवळ्या रेशनकार्ड धारकांनाच उपचार मोफत देणार असल्याचे जाहीर केले आहे. तर सफेद रेशनकार्ड धारक कोरोना रूग्णांकडून भलेमोठे बिलं आकारली जात आहेत. कोरोना रूग्णांवर उपचार करण्यासाठी रेशनकार्डचे बंधन न ठेवता, सरसकट मोफत उपचार सरकारने केले पाहिजेत. लॉकडाऊन जाहीर केल्यानंतर केंद्र सरकारने जे अन्नधान्य महाराष्ट्रात पाठवले आहे त्याचे नियोजन करण्यात राज्य सरकार अपयशी ठरले असून नागरिकांना तांदूळ मिळतात तर डाळ मिळत नाही, कधी डाळ मिळते तर साखर मिळत नाही अशी अवस्था असून याचा निषेध करण्यासाठी आजचे हे आंदोलन केले असल्याची माहिती शहर अध्यक्ष प्रेमनाथ म्हात्रे यांनी दिली.