पावसाचे पाणी चाळीत शिरते त्यासाठी कारवाई न केल्यास संत तुकाराम नगरच्या रहिवाशांचा कल्याण डोंबिवली पालिकेत राहायला येण्याचा इशारा

कल्याण : पावसाचे पाणी चाळीत आणि घरात शिरल्याने हैराण झालेल्या संत तुकाराम नगरमधील रहिवाशांनी आज कल्याण डोंबिवली पालिका प्रशासनाविरोधात उपोषणाचा इशारा दिला होता. त्यानुसार येथील रहिवासी उपोषणाला

 कल्याण : पावसाचे पाणी चाळीत आणि घरात शिरल्याने हैराण झालेल्या संत तुकाराम नगरमधील रहिवाशांनी आज कल्याण डोंबिवली पालिका प्रशासनाविरोधात उपोषणाचा इशारा दिला होता. त्यानुसार येथील रहिवासी उपोषणाला बसले असता पालिकेच्या सुरक्षा रक्षकांनी हे उपोषण उधळून लावत पुन्हा पत्रव्यवहार करण्यास सांगितले. यावेळी या रहिवाशांनी १५ दिवसांत आमचा प्रश्न न सुटल्यास येथील सुमारे २५० नागरिक पालिकेत राहायला येऊ, असा इशारा दिला आहे.

कल्याण पश्चिमेतील प्रभाग क्र. २३ फ्लॉवर व्हॅली येथील संत तुकाराम नगर येथे ७ चाळी असून ६० कुटुंब गेल्या १५ वर्षांपासून येथे राहत आहेत. मात्र गेल्या १० वर्षांपासून याठिकाणी आजूबाजूला अनेक इमारती उभ्या राहिल्या आहेत. या इमारतींमुळे प्रत्येक पावसात याठिकाणी नागरिकांच्या घरात पाणी शिरते. यावर्षी देखील निसर्ग चक्रीवादळ आणि काल झालेल्या पावसाने येथील नागरिकांच्या घरात पाणी शिरले आहे. याबाबत प्रशासनाकडे पाठपुरावा करून देखील समस्या जैसे थे असल्याने येथील रहिवाशांनी उपोषणाला बसण्याचा इशारा दिला होता. त्यानुसार या रहिवाशांचे प्रतिनिधी म्हणून सचिन राउत हा तरुण उपोषणाला बसला होता. मात्र सुरक्षा रक्षकांनी हे उपोषण उधळून लावले. यावेळी या उपोषणकर्त्यांना पुन्हा प्रभाग कार्यालयात पत्रव्यवहार करण्यास सांगण्यात आले. सुरक्षा रक्षकांच्या सांगण्यावरून हे उपोषण मागे घेत येत्या १५ दिवसांत जर संत तुकाराम नगर मधील पाणी साचण्याचा प्रश्न निकाली न निघाल्यास सर्व कुटुंबियांना घेऊन सुमारे २५० नागरिक पालिकेत राहायला येऊ असा इशारा त्यांनी दिला आहे.