कल्याण डम्पिंग ग्राऊंडची आग २४ तासानंतर आली आटोक्यात

कल्याण : कल्याणच्या आधारवाडी परिसरातील डम्पिंग ग्राऊंडला शनिवारी दुपारी दोनच्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना घडली. या आगीमुळे संपूर्ण शहरात धुराचे लोट पसरले असून ही आग विझवण्यासाठी २४

कल्याण : कल्याणच्या आधारवाडी परिसरातील डम्पिंग ग्राऊंडला शनिवारी दुपारी दोनच्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना घडली. या आगीमुळे संपूर्ण शहरात धुराचे लोट पसरले असून ही आग विझवण्यासाठी  २४  तासाचा कालावधी लागला. विशेष म्हणजे डम्पिंग शेजारीच असलेल्या महानगर गॅसच्या पंपिंग स्टेशनमुळे याठिकाणी मोठी दुर्घटना टळली.

कल्याण पश्चिमेतील खाडी किनारी असलेल्या डोंगरा एवढ्या डम्पिंग ग्राऊंडवर शनिवारी कचऱ्याच्या ढिगाऱ्याला ही आग लागली होती. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्यांनी घटनास्थळी पोहचत आग आटोक्यात आणण्याचे काम सुरु केले. आगीने रुद्र रूप धारण केल्याने आग आटोक्यात येणे शक्य नसल्याने कल्याण डोंबिवली महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या १० गाड्या आणि २० पाण्याचे टँकर मागविण्यात आले. तसेच उल्हासनगरची अग्निशमन दलाची एक गाडी मागविण्यात आली. तर ही आग विझविण्यासाठी तब्बल २४ तासांचा कालावधी लागला असल्याची माहिती अग्निशमन दलाचे अधिकारी दिलीप गुंड यानी दिली.