कल्याण-टिटवाळा, मोहने येथे रिक्षा चालकांकडून रिक्षात बसविले जातात ५ प्रवासी, जास्त भाडे घेऊन वाहतूक

कल्याण : कोरोना संकटामुळे लॉकडाऊन घोषित होता. लॉकडाऊनमध्ये आता थोडी सूट मिळाली आहे. आता रिक्षाचालक ट्रॅफिक पोलीस आणि आरटीओ कार्यालयातील कार्यरत असणाऱ्यांना फाट्यावर मारून आपला

 कल्याण :  कोरोना संकटामुळे लॉकडाऊन घोषित होता. लॉकडाऊनमध्ये आता थोडी सूट मिळाली आहे.  आता रिक्षाचालक ट्रॅफिक पोलीस आणि आरटीओ कार्यालयातील कार्यरत असणाऱ्यांना फाट्यावर मारून आपला रिक्षा व्यवसाय सुरु करीत असून एकाच रिक्षात ५ पॅसेंजर बसवून आपला व्यवसाय बिनधास्त करीत आहे. यामुळे सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडत आहे. रिक्षा चालक नियम धाब्यावर बसवत असल्याचे चित्र कल्याण-टिटवाळा मोहने येथे आढळून येत आहे.

गेल्या अडीच महिन्यापासून लॉक डाऊन मुळे रिक्षाचालकांच्या उपजीविकेचा प्रश्न निर्माण झाला असताना शासनाने परिसरात कार्यरत असणाऱ्या रिक्षाचालकांना कुठल्याही स्वरूपाची मदत केली नसल्याने रिक्षाचालकांनी आरटीओ, ट्रॅफिक पोलिसांनी दिलेल्या नियमांना फाटा देत अगदी पद्धतशीर प्रवाशांना लुटण्याचा धंदा सुरू केला आहे.
गेल्या  दहा दिवसांपासून लॉकडाऊनला महाराष्ट्र शासनाने सुट देत रिक्षाचालकाने २ पॅसेंजर घेण्याची मुभा दिली होती. मात्र येथील रिक्षाचालक दोन पॅसेंजर ऐवजी एकाच रिक्षाचा पाच जणांना बसून आणि प्रवाशांकडून अव्वाच्या सव्वा भाडे घेऊन अवैधरित्या व्यवसाय करीत असल्याचे दिसून येत आहे.
रिक्षामध्ये बसायचे तर बसा नाहीतर निघा, असे रिक्षाचालक प्रवाशांना सांगत असल्याचे आढळून आले. यावर नियंत्रण कोणाचेच नसल्याचे येथे स्पष्ट होत आहे. यामुळे सोशल डिस्टन्सिंगचा कारभार रिक्षाचालकांच्या कार्यपद्धतीमुळे बिघडला आहे. अतिरिक्त जादा भाडे घेऊन रिक्षामध्ये किमान पाच प्रवासी बसवत असल्याने करोनाचा प्रदुर्भाव कसा टाळणार, असा सवाल उभा रहिला आहे.
कल्याण आरटीओचे प्रमुख संजय ससाने यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, वन प्लस् टु इतकेच जण रिक्षाने प्रवास करू शकतात. तसेच अतिरिक्त प्रवासी घेणाऱ्या रिक्षा चालकांवर कारवाईचा बडगा उचलला जातो. प्रवाशांनीदेखील २ पेक्षा जास्त प्रवासी रिक्षा चालक घेत असेल तर  अशा रिक्षामधून
  प्रवास करू नये. तसेच मीटरप्रमाणे भाडे द्यावे. अतिरिक्त भाडे घेत असल्यास तक्रार करावी. प्रवाशांनीदेखील सोशल डिस्टन्सला प्राधान्य देत प्रवास करावा.      कल्याण वाहतूक नियंत्रण कक्षाचे पोलीस निरीक्षक सुखदेव पाटील यांच्याशी संपर्क साधला असता २७ रिक्षांवर जप्तीची कारवाई करण्यात आली असून ९४ रिक्षा
चालकांवर कारवाई करण्यात आली असुन धव्नीक्षेपकाद्वारे सोशल डिस्टन्सिंगचे पालन, मास्क लावणे, आदींची जनजागृती करण्यात येत आहे. बेकायदेशीरपणे रिक्षा वाहतुकीवर कारवाई चा बडगा सुरु राहणार आहे. आर टी ओ. ने ग्रामीण भागातील बेकायदेशीर रिक्षा प्रवासी वाहुतुकीवर नियंत्रण ठेवत कारवाईचा बडगा उचलणे कोरोना संसर्ग टाळण्यासाठी गरजेचे असल्याचे चित्र यानिमित्ताने दिसत आहे