रुग्णवाहिकेमध्ये सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा, रुग्णांचे आरोग्य धोक्यात

कल्याण : कोरोना रुग्णांच्या संख्येने कल्याण डोंबिवलीत हाहाकार माजवला असतानाच वाढत्या कोरोना रुग्णांमुळे पालिकेकडे रुग्णवाहिकांची कमतरता भासत असून रुग्णवाहिका नसल्याने एकाच रुग्णवाहिकेत तब्बल ८

 कल्याण : कोरोना रुग्णांच्या संख्येने कल्याण डोंबिवलीत हाहाकार माजवला असतानाच वाढत्या कोरोना रुग्णांमुळे पालिकेकडे रुग्णवाहिकांची कमतरता भासत असून रुग्णवाहिका नसल्याने एकाच रुग्णवाहिकेत तब्बल ८ कोरोना रुग्णांना कोंबून टाटा आमंत्रा याठिकाणी उपचारासाठी नेत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी पालिकेकडून नागरिकांना अनेक उपदेशाचे डोस देण्यात येत आहेत. यामध्ये सोशल डीस्टन्स पाळण्यावर विशेष भर देण्यात येतो. सरकारी बस, ट्रेनमध्ये देखील एका सीटवर एक प्रवासी, खाजगी वाहनांनादेखील प्रवासी संख्येची मर्यादा घालून दिलेली आहे.  असे असताना, कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांना टाटा आमंत्रा याठिकाणी नेण्यासाठी सामुहिक रीतीने एकाच रुग्णवाहीकेतून नेण्यात येत असल्याचा प्रकार उघडीस आला आहे. शालेय विद्यार्थ्यांची ज्याप्रमाणे वाहतूक होते त्याचप्रमाणे संपूर्ण कल्याण शहरातील कोरोना रुग्णांना रुग्णवाहिकेत भरत ही रुग्णवाहिका कल्याण पश्चिमेतील बेतूरकर पाडा याठिकाणी आली. येथे एकाच घरातील दोन महिला रुग्ण रुग्णवाहिकेची वाट बघत होत्या.

यावेळी रुग्णवाहीकेचा दरवाजा उघडताच ही रुग्णवाहिका आधीच भरलेली असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. तरी देखील या दोन रुग्णांना याच रुग्णवाहिकेत बसविण्यात आले. एखादा खाटीक ज्याप्रमाणे  गुरांना एखाद्या गाडीत कोंबून नेतो तशी अवस्था या कोरोना रुग्णांची झाल्याचे पाहायला मिळाले. सर्व कोरोना रुग्ण एकाच रुग्णवाहिकेत बसविल्याने कोणाला जास्त प्रमाणात कोरोना असल्यास एखाद्या कमी प्रमाणात कोरोनाची लागण असलेल्या रुग्णांला देखील जास्त प्रमाणात याचा संसर्ग होण्याची शक्यता आहे. अशाप्रकारे एकाच रुग्णवाहिकेत ७ ते ८ रुग्ण कोंबल्याने रुग्णांची सुरक्षा धोक्यात आली असून याला जबाबदार कोण असा सवाल नागरिक करत आहेत. दरम्यान कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या आरोग्य यंत्रणेचा बोजवारा उडाला असून, अशाप्रकारे कोरोना रुग्णांची वाहतूक करणे म्हणजे नागरिकांच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार सुरु असल्याची प्रतिक्रिया हा प्रकार उघडकीस आणणाऱ्या मनसेचे उपशहर अध्यक्ष गणेश चौधरी यांनी दिली. तर याबाबत पालिका प्रशासनाकडे संपर्क साधला असता कोणतेही उत्तर मिळाले नाही.