अतिधोकादायक इमारती पाडण्याचे काम सुरू, आयुक्तांच्या आदेशानंतर पाडकामांना वेग

मनपा आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी महापालिका क्षेत्रातील अतिधोकादायक इमारतींची पाहणी करुन त्या निष्कासित करणेबाबतचे निर्देश सर्व प्रभागक्षेत्र अधिका-यांना दिले आहेत. त्यानंतर कल्याण पश्चिम अन्सारी चौक दवाखान्याजवळ जहीर मौलवी या ७० वर्षे जुन्या तळमजला + २ या अतिधोकादायक इमारतीच्या निष्कासनाची कारवाई गुरुवारपासून सुरु करण्यात आलीय.

कल्याण : कल्याण डोंबिवली मनपा क्षेत्रातील अतिधोकादायक इमारती पाडण्याच्या कारवाईने वेग घेतला असल्याने मनपाच्या रडारवर अतिधोकादायक इमारती आल्या आहेत.

मनपा आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी महापालिका क्षेत्रातील अतिधोकादायक इमारतींची पाहणी करुन त्या निष्कासित करणेबाबतचे निर्देश सर्व प्रभागक्षेत्र अधिका-यांना दिले आहेत. महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिलेल्या निर्देशानुसार, अनाधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाचे उपआयुक्त सुधाकर जगताप यांचे मार्गदर्शनाखाली, क प्रभागक्षेत्र अधिकारी भागाजी भांगरे यांनी, त्यांच्या अनधिकृत बांधकाम नियंत्रण पथकातील कर्मचारी आणि महापालिकेचे पोलिस कर्मचारी यांच्या मदतीने कल्याण पश्चिम अन्सारी चौक दवाखान्याजवळ जहीर मौलवी या ७० वर्षे जुन्या तळमजला + २ या अतिधोकादायक इमारतीच्या निष्कासनाची कारवाई गुरुवारपासून सुरु केली.

या इमारती मधील २० खोल्यांमध्ये रहिवास होता,  तथापि इमारत मालकाशी झालेल्या चर्चेअंती तेथील रहिवाश्यांनी आपल्या रुम रिकाम्या केल्यानंतर १ पोकलेन व १ जेसीबी यांच्या साहाय्याने ही इमारत तोडण्यास प्रारंभ केला आणि गुरुवारी दुपारी ही इमारत संपूर्ण निष्कासित करण्याची कारवाई पूर्ण झाली.