कल्याण डोंबिवली पालिका आयुक्त आणि पोलीस प्रशासनाने केली कंटेनमेंट झोनची पाहणी

कल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असून यावर आळा घालण्यासाठी पालिकेच्या वतीने अनेक उपाययोजना करण्यात येत आहेत. याचाच एक भाग म्हणून

 कल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असून यावर आळा घालण्यासाठी पालिकेच्या वतीने अनेक उपाययोजना करण्यात येत आहेत. याचाच एक भाग म्हणून पालिका आयुक्त, अप्पर पोलीस आयुक्त, पोलीस उपायुक्त आणि सहाय्यक पोलीस आयुक्तांनी कल्याणमधील कंटेनमेंट झोनची पाहणी केली. 

कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात ११० कंटेनमेंट झोन असून याठिकाणी कडक नियमावली राबवली जात आहेत. एखाद्या भागात कोरोनाचा पेशंट सापडल्यावर तो परिसर कंटेनमेंट झोन म्हणून तयार केला जातो. या कंटेनमेंट झोनचे व्यवस्थापन हे महत्त्वाचे असून त्याच्यामुळे कोरोनाचा संसर्ग रोखू शकतो. यासाठी पालिका प्रशासन आणि पोलीस यंत्रणेसोबत या कंटेंटमेंट झोनची पाहणी केली असून याठिकाणी नियम कडक आहेत की नाही याची पाहणी केली असून प्रत्येक कंटेनमेंट झोनमध्ये चांगल्याप्रकारे नियमाचे पालन केले जात असल्याची माहिती पालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिली. तर प्रत्येक दुकानदारांनी दुकान सुरु ठेवताना नियमाचे पालन न केल्यास अशा दुकानदारांवर कारवाई करण्याचा ईशारादेखील आयुक्तांनी दिला आहे. कल्याण डोंबिवलीमध्ये जेवढे कंटेनमेंट झोन आहेत त्याठिकाणी एकच एन्ट्री पॉईंट ठेवला असून त्याठिकाणी २ पोलीस कर्मचारी आणि गस्तदेखील ठेवली जात आहे. पोलीस, पालिका प्रशासन आणि नागरिकांमध्ये समन्वय असावा यासाठी आज कंटेनमेंट झोनची पाहणी केली असून कंटेनमेंट झोनमधील नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचा ऑनलाईन पुरवठा केला जात आहे. त्यामुळे कंटेनमेंट झोन बाहेर कोणीही न जाता किंवा कंटेनमेंट झोनबाहेरील व्यक्तीने कंटेनमेंट झोनमध्ये न जाण्याचे आवाहन अप्पर पोलीस आयुक्त दत्तात्रय कराळे यांनी केले आहे. यावेळी कल्याण परिमंडळ ३ चे पोलीस उपायुक्त विवेक पानसरे, सहाय्यक पोलीस आयुक्त अनिल पोवार आदी उपस्थित होते.