कल्याण डोंबिवलीमध्ये आज कोरोनाच्या १३ नव्या रुग्णांची नोंद

कल्याण : सध्याची स्थिती पाहता मुंबईला जाणाऱ्या अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांमुळे कल्याण डोंबिवली परिसरात कोरोनाचे प्रमाण वाढतत आहे. आज कल्याण डोंबिवली परिसरात कोरोनाचे नवीन १३ रुग्ण आढळले असून या

कल्याण : सध्याची स्थिती पाहता मुंबईला जाणाऱ्या अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांमुळे कल्याण डोंबिवली परिसरात कोरोनाचे प्रमाण वाढतत आहे. आज कल्याण डोंबिवली परिसरात कोरोनाचे नवीन १३ रुग्ण आढळले असून या रूग्णांमध्ये मुंबईला अत्यावश्यक सेवांसाठी जाणाऱ्या ८ रुग्णांचा समावेश असल्याने ही चिंतेची बाब आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या १५६ झाली असून यापैकी ३ रुग्ण  मृत, तर ४६ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला असून १०७ रुग्ण विविध रुग्णालयात उपचार घेत आहेत.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन लागू केल्यानंतर मुंबईची लाईफलाईन समजली जाणारी लोकल सेवा देखील बंद करण्यात आली. सर्व खाजगी अस्थापना देखील बंद करण्यात आल्या. मात्र मुंबई परिसरात अत्यावश्यक सेवा देणारे डॉक्टर्स, नर्स, रूग्णालयातील कर्मचारी, पोलीस, महापालिका कर्मचारी यांना कामाला जावे लागत आहे. मुंबईतील बराचसा चाकरमानी हा कल्याण डोंबिवली परिसरात देखील राहत असल्याने या अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना ने आण करण्याकरिता बेस्टच्या बस धावत आहेत. कल्याण डोंबिवलीतून दररोज हजारो कर्मचारी मुंबईला जात असून या कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण होत आहे. त्यामुळे मुंबईहून कोरोना कल्याण डोंबिवलीत येत असल्याचे निदर्शनास आले आहे.  आज आढळलेल्या १३ रुग्णांपैकी तब्बल ८ रुग्ण हे मुंबईला अत्यावश्यक सेवेत काम करत आहेत. त्यामुळे वेळीच या अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची व्यवस्था मुंबईतच न केल्यास कल्याण डोंबिवलीतील कोरोना रुग्णांची संख्या आणखी झपाट्याने वाढेल.

आज आढळलेल्या रूग्णांमध्ये   डोंबिवली पूर्वेतील १३ वर्षीय मुलगा, डोंबिवली पश्चिमेतील २९ वर्षीय आणि ३६ वर्षीय महिला आणि १० वर्षीय मुलगा हे कोरोना बाधित रुग्‍णाचे सहवासित आहेत. तर कल्याण पश्चिमेतील राहणारा ४२ वर्षीय पुरुष मुंबई येथील ईसिजी टेक्नीशियन, मुंबई येथील फार्मा. कंपनीतील ३६ वर्षीय पुरुष कर्मचारी, मुंबई येथील ५० वर्षीय पुरुष कर्मचारी, डोंबिवली पश्चिमेतील मुंबई येथील ३७ वर्षीय पुरुष आरोग्य कर्मचारी, डोंबिवली पूर्वेतील ४० वर्षीय आणि ५७ वर्षीय महिला या मुंबई येथील शासकीय रुग्णालयातील नर्स आहेत. तर ४४ वर्षीय पुरुष मुंबई येथील पोलीस कर्मचारी असून ४६ वर्षीय पुरुष  मुंबई येथील शासकीय कार्यालयातील कामगार आहे. तसेच कल्याण पूर्वेत तापाच्या दवाखान्यातील ६० वर्षीय महिला रुग्णाला देखील कोरोनाची लागण झाली असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली. 
 
एकुण १५६  रुग्णांची वर्गवारी – कल्याण पूर्व – ३०, कल्याण पश्चिम -२०, डोंबिवली पूर्व -५५, डोंबिवली पश्चिम -३९ 
मांडा टिटवाळा -५,  मोहने -६, नांदिवली – १