कल्याण डोंबिवलीत एकाच दिवशी सापडले नवीन २० रुग्ण –  कोरोना रुग्णांची संख्या २५३ वर

कल्याण :कोरोनाचा प्रादुर्भाव काही केल्या कमी होत नसून कल्याण डोंबिवलीमध्ये आज आढळलेल्या रुग्णांनी कोरोना रुग्णांच्या संख्येचा उच्चांक गाठला आहे. कल्याण डोंबिवलीमध्ये आज कोरोनाचे तब्बल २० रुग्ण

कल्याण :कोरोनाचा प्रादुर्भाव काही केल्या कमी होत नसून कल्याण डोंबिवलीमध्ये आज आढळलेल्या रुग्णांनी कोरोना रुग्णांच्या संख्येचा उच्चांक गाठला आहे. कल्याण डोंबिवलीमध्ये आज कोरोनाचे तब्बल २० रुग्ण आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. आज आढळलेल्या या रूग्णांमध्ये मुंबईतील पोलीस, आरोग्य आणि इतर खाजगी ९ कर्मचाऱ्यांचा तर एका दोन महिन्यांच्या मुलीचा आणि एका खाजगी ऑनलाईन फूड डिलीवरी अॅप मधील कर्मचाऱ्याचा समावेश आहे. तर ९ रुग्ण हे कोरोनाबाधित रुग्णांचे सह्वासित आहेत. 

कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या २५३ झाली असून यापैकी ३ जण मृत, तर ७६ रुग्णांना आतापर्यंत डिस्चार्ज देण्यात आला असून १७४ रुग्ण उपचार घेत आहेत. आज आढळलेल्या रूग्णांमध्ये मुंबईतील पोलीस कर्मचारी असलेल्या कल्याण पूर्वेतील दोन ३८ वर्षीय पुरुष, कल्याण पश्चिमेतील ३६ वर्षीय पुरुष, कल्याण पूर्वेतील ५० वर्षीय पुरुष मुंबई येथील शासकीय कर्मचारी, कल्याण पूर्वेतील ३८ वर्षीय पुरुष मुंबई येथील शासकीय आरोग्य कर्मचारी, कल्याण पश्चिमेतील ३८ वर्षीय पुरुष मुंबई येथील शासकीय रुग्णालयातील कर्मचारी, कल्याण पश्चिमेतील ४५ वर्षीय पुरुष मुंबई येथील खाजगी कंपनीतील कर्मचारी, आंबिवली येथील २७ वर्षीय पुरुष मुंबई येथील खाजगी रुग्णालयातील कर्मचारी, डोंबिवली पूर्वेतील २५ वर्षीय पुरुष मुंबई येथील खाजगी हॉटेलमधील कर्मचारी यांचा समावेश आहे. तर डोंबिवली पश्चिमेतील ३३ वर्षीय महिला, ५३ वर्षीय महिला, २ महिन्यांची बालिका, ६२ वर्षीय पुरुष, ३२ वर्षीय पुरुष, ७० वर्षीय महिला,  कल्याण पश्चिमेतील ३७ वर्षीय पुरुष ३८ वर्षीय महिला, ५४ वर्षीय महिला हे कोरोनाबाधित रुग्णाचे सहवासीत आहेत. तसेच कल्याण पश्चिमेतील ६२ वर्षीय महिलेला आणि  कल्याण पूर्वेतील खाजगी ऑनलाईन फूड डिलीवरी अॅप मधिल कर्मचारी असलेल्या ३२ वर्षीय पुरुषाला देखील कोरोनाची लागण झाली आहे. 

कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात आढळून आलेल्या कोरोना बाधित रुग्णांपैकी बहुतांश रुग्ण हे कर्तव्यासाठी मुंबई व अन्य ठिकाणी येथे ये-जा करणारे आहेत. अशा व्यक्तींनी कामावरुन घरी आल्यावर होमआयसोलेशनमध्ये रहावे, तसेच घरातील वृध्द व्यक्तींपासून तसेच लहान मूलांपासून दूर रहावे म्हणजे त्यांचे कुटूंबिय देखील सुरक्षित राहू शकतील. त्याचप्रमाणे दैनंदिन व्यवहारात देखील सोशल डिस्टन्सींग पाळावे, महापालिकेकडे प्राप्त माहितीनुसार दोन जवळ- जवळच्या घरांमध्ये वस्तुंची देवाण-घेवाण केल्यामुळेही कोरोनाचा संसर्ग झाल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे अशा प्रकारे वस्तुंची देवाण-घेवाण केल्यावर हात धुणे, सॅनिटायझेशन करणे इ. दक्षता घेण्याचे आवाहन महानगर पालिकेने केले आहे.  

कोरोन बाधित रुग्ण सापडल्यावर त्यांच्या निकट सहवासीतांना महापालिकेमार्फत ‘टाटा आमंत्रा’ येथे क्वारंटाईन केले जाऊन त्यांची स्वॅब टेस्ट केली जाते. ही टेस्ट पॉझिटिव्ह आढळल्यास संबंधित रुग्णांवर त्वरीत उपचार सुरु करणे सुलभ होते व रुग्णांच्या निकट सहवासीतांना संस्थात्मक क्वारंटाईन केल्यामुळे इतरांना संसर्ग होण्यापासून टाळता येत असल्याची माहिती महापालिकेने दिली आहे.