कल्याण डोंबिवलीमध्ये १२२ पैकी २० वॉर्डात कोरोनाचे रुग्ण, आढळले १० हॉटस्पॉट

कल्याण : कल्याण पूर्वेत २ कोरोना रुग्ण नव्याने आढळले असून कल्याण डोंबिवली महानगर पालिका क्षेत्रातील कोरोना रुग्णांची संख्या ७५ झाली आहे. तर कल्याण डोंबिवलीत कोरोनाचे १० हॉटस्पॉट्स आढळले

 कल्याण : कल्याण पूर्वेत २ कोरोना रुग्ण नव्याने आढळले असून कल्याण डोंबिवली महानगर पालिका क्षेत्रातील कोरोना रुग्णांची संख्या ७५ झाली आहे.  तर कल्याण डोंबिवलीत कोरोनाचे १० हॉटस्पॉट्स आढळले असून महापालिकेच्या १२२ पैकी २० वॉर्डात कोरोना रुग्ण असल्याची माहिती महापालिका आयुक्त डॉ. विजय सुर्यवंशी यांनी दिली आहे. तर उर्वरित १०२ प्रभागात कोरोनाचा एकही रुग्ण नसून विनाकारण गाड्या घेऊन घराबाहेर पडणाऱ्या तरुणांवर अधिक कडक कारवाई करण्याच्या सूचना आपण पोलिसांना दिल्याचेही आयुक्तांनी सांगितले आहे. 

कल्याण डोंबिवली महापालिकेतर्फे देण्यात आलेल्या माहितीनुसार आतापर्यंत केडीएमसी क्षेत्रात ७५ रुग्ण आढळून आले असून त्यापैकी २६ रुग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. तर कल्याण डोंबिवलीमध्ये डोंबिवलीत सर्वाधिक ४९ रुग्ण आढळल्याचे महापालिका आयुक्तांनी सांगितले. आज आढळलेल्या कल्याण पूर्वेतील रुग्णांमध्ये  ३८ वर्षीय  आणि २९ वर्षीय पुरुषांचा समावेश आहे. या दोन्ही रुग्णांची प्रकृती स्थिर आहे. महानगरपालिकेच्या इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन मध्ये एकूण ९१ नागरिक असून महापालिका क्षेत्रात ३३६७ लोकांना होम क्वारंटाईन केलेले होते, त्यापैकी १८०० लोकांच्या कालावधी संपल्यामुळे १४८७ लोक होम क्वारंटाईन मध्ये आहेत. कल्याण शीळ रोड येथील निऑन रुग्णालयात २८ रुग्ण दाखल असून त्यापैकी २७ रुग्ण पॉझिटिव्ह आहेत.
 
 
महापालिका क्षेत्रातील एकुण रुग्ण :- ७५  या रुग्णांपैकी – २ मृत, २६ जणांना डिस्चार्ज , एकुण उपचार घेत असलेले रुग्‍ण ४७ 
विभागवार आकेडेवारी – डोंबिवली पूर्व – ३४, डोंबिवली पश्चिम- १५, कल्याण पूर्व- १५, कल्याण पश्चिम १०, टिटवाळा १ 
 
कोरोनाचे रुग्ण आढळलेेल्या २० प्रभागांची नावे – गांधारे, टिटवाळा गणेश मंदिर, शहाड, फ्लॉवर व्हॅली, चिकणघर गावठाण, गरीबाचा वाडा, ठाकूरवाडी, गावदेवी मंदिर नवागाव, कोपर रोड, जुनी डोंबिवली, कोपर गाव, म्हात्रे नगर, सारस्वत कॉलनी, तुकाराम नगर, अंबिका नगर, नेहरू नगर, जाईबाई विद्यामंदिर-साईनगर, विजय नगर, तिसगाव गावठाण, सागांव सोनारपाडा
उर्वरित १०२ प्रभागामध्ये अद्याप एकही पॉझिटिव्ह केस आढळलेली नाही.
 
 
कल्याण डोंबिवलीचे १० कोरोना हॉटस्पॉट 
डोंबिवली पूर्व – म्हात्रे नगर, आयरे गाव,  तुकाराम नगर, छेडा रोड
डोंबिवली पश्चिम – रेतीबंदर रोड,  टेलकोस वाडी
कल्याण पूर्व – चिंचपाडा रोड, भगवान नगर.
कल्याण पश्चिम – खडकपाडा, वायले नगर