कल्याण डोंबिवलीमध्ये गेल्या २४ तासांमध्ये ११ रुग्णांची नोंद, कोरोनाबाधितांची संख्या १०८ वर

कल्याण : कोरोनाने कल्याण डोंबिवलीत शतक पूर्ण केले असून गेल्या २४ तासांत कोरोनाचे ११ नवीन रुग्ण आढळल्याने कल्याण डोंबिवली महानगर पालिका क्षेत्रातील कोरोना रुग्णांची संख्या १०८ झाली

 कल्याण :  कोरोनाने कल्याण डोंबिवलीत शतक पूर्ण केले असून गेल्या २४ तासांत कोरोनाचे ११ नवीन रुग्ण आढळल्याने  कल्याण डोंबिवली महानगर पालिका क्षेत्रातील कोरोना रुग्णांची संख्या १०८ झाली आहे.  कल्याण डोंबिवलीत कोरोना रुग्णांची संख्या वाढतच असून आता या संख्येने शतक पूर्ण केल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. आज आढळलेल्या नवीन ११ रुग्णांमध्ये कल्याण पश्चिमचे ३, कल्याण पूर्व ३, डोंबिवली पश्चिम ४ आणि टिटवाळा येथील एका रुग्णाचा समावेश आहे. यामध्ये डोंबिवली पश्चिम मधील ५० वर्षीय, २२ वर्षीय आणि २३ वर्षीय पुरुषांचा समावेश असून हे तिघे कोरोनाबाधित रुग्णाचे निकट सहवासीत आहेत. तर ५३ वर्षीय पुरुष हा धारावी येथील शासकीय कर्मचारी आहे. कल्याण पश्चिम मधील ६४ वर्षीय महिला, ४७ वर्षीय महिला आणि ५४ वर्षीय पुरुष या तिघाना कोरोनाची लागण झाली असून हे तिघे देखील कोरोना बाधित रुग्णाचे निकट सहवासीत आहेत. कल्याण पूर्वेतील ठाणे येथे शासकीय कार्यालयात कार्यरत असणाऱ्या ४३ वर्षीय पुरुषाचा, मुंबई येथील शासकीय रुग्णालयातील कर्मचारी असलेल्या ३३ वर्षीय महिलेला आणि कॅन्सर पेशंट असलेल्या ४२ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. तसेच मांडा टिटवाळा येथील ४२ वर्षीय पुरुषाला देखील कोरोनाची लागण झाली आहे. महापालिका क्षेत्रातील कोरोना रुग्णांची संख्या १०८ झाली असून यामध्ये ३ जण मृत झाले आहेत. तर ३३ जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून ७२ रुग्ण उपचार घेत आहेत.