कल्याण डोंबिवलीमध्ये १२ रुग्णांची वाढ, शहरात १२९ कोरोनाबाधित

कल्याण : विविध उपाययोजना करूनदेखील कल्याण डोंबिवलीमधील कोरोना रुग्ण वाढतच असून आज या रुग्णांमध्ये १२ नवीन रुग्णांची वाढ झाली आहे. यामुळे कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील कोरोना

 कल्याण :  विविध उपाययोजना करूनदेखील कल्याण डोंबिवलीमधील कोरोना रुग्ण वाढतच असून आज या रुग्णांमध्ये १२ नवीन रुग्णांची वाढ झाली आहे. यामुळे कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या १२९ झाली आहे. आजच्या रुग्णांमध्ये मुंबई येथे कामाला असलेल्या पोलीस, आरोग्य कर्मचारी आणि पत्रकार यांचा समावेश आहे. आतापर्यंत ४० रुग्णांनी कोरोनावर योग्य उपचार करून मात मिळवली आहे. त्यांना हॉस्पिटलमधून घरी सोडण्यात आले आहे. सध्या ८६ जणांवर उपचार सुरू असून एकूण कोरोनाबधितांची संख्या १२९ इतकी झाली आहे.तर यातील ३ जणांचा मृत्यूदेखील झाला आहे. महानगरपालिका हद्दीत कल्याण पूर्व -२७, कल्याण पश्चिम -१५,  डोंबिवली पूर्व -४७, डोंबिवली पश्चिम -३२, मांडा टिटवाळा -४,  मोहने -४ असे रुग्ण आहेत.

आज आढळलेल्या रुग्णांमध्ये डोंबिवली पश्चिमेतील ५० वर्षीय महिला, ३० वर्षीय पुरुष  कोरोना बाधित रुग्णाचे निकट सहवासीत आहे. तर ४५ वर्षीय पुरुष आणि १६ वर्षीय महिलेचा देखील सहभाग आहे. डोंबिवली पूर्वेतील  ३० आणि ३३ वर्षीय पुरुष हे मुंबई येथील आरोग्य कर्मचारी आहेत.  तर डोंबिवली पूर्वेतच राहणाऱ्या मुंबई येथे वृत्तवाहिनीचा पत्रकार असलेल्या ३९ वर्षीय पुरुषाला आणि मुंबई येथे पोलीस कर्मचारी असलेल्या ३९ वर्षीय पुरुषाला देखील कोरोनाची लागण झाली आहे. मांडा टिटवाळा येथे देखील कोरोना रुग्ण वाढत असून आजच्या रुग्णांमध्ये मांडा टिटवाळा येथील मुंबई येथे आरोग्य कर्मचारी असलेल्या ५२ वर्षीय महिलेला आणि कोरोना बाधित रुग्णाची निकट सह्वासित असलेल्या १२ वर्षीय मुलीला तसेच कल्याण पूर्वेतील मुंबई येथे आरोग्य कर्मचारी असलेल्या ४३ वर्षीय महिलेला आणि कल्याण पश्चिम मधील मुंबई येथे पोलीस कर्मचारी असलेल्या ३६ वर्षीय पुरुषाला कोरोनाची लागण झाली असल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.