कोरोनाबाबतच्या उपाययोजनांची महापौर आणि आयुक्तांनी पत्रकार परिषदेत दिली माहिती

कल्याण : कोरोना साथीच्या पार्श्वभूमिवर महापालिका करीत असलेल्या उपाययोजनांची माहिती महापौर विनिता राणे व पालिका आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशी यांनी पत्रकार परिषद घेत दिली. महापालिकेने कोरोनाच्या

 कल्याण : कोरोना साथीच्या पार्श्वभूमिवर महापालिका करीत असलेल्या उपाययोजनांची माहिती महापौर विनिता राणे व पालिका आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशी यांनी पत्रकार परिषद घेत दिली. महापालिकेने कोरोनाच्या प्रादुर्भावावर उपाययोजना करणेसाठी महापालिकेचे डोंबिवली येथील शास्त्रीनगर रुग्णालय (३६ बेड्स + ६ आय.सी.यू.बेड्स) हे डेडिकेटेड कोवीड सेंटर म्हणून जाहीर केले असून, या व्यतिरिक्त बाज आर.आर.हॉस्पिटल डोंबिवली (५६ बेड्स), निऑन हॉस्पिटल, कल्याण शिळरोड (२८ बेड्स) आणि होलिक्रॉस हॉस्पिटल कल्याण पश्चिम (७० बेड्स) यांचेशी सामंजस्य करार केलेला आहे.

सद्याच्या परिस्थितीमध्ये महापालिकेत डॉक्टरांची कमतरता असल्यामुळे महापालिकेने आय.एम.ए., निमा, कॅम्पा या संस्थांमधील डॉक्टरांचे सहकार्य मिळविले आहे. दिनांक ९ एप्रिलपासून महापालिकेने तापाचे दवाखाने सुरु केले असून, सदर दवाखान्यात तापाचे क्रिनिंग सुरु केले आहे. महापालिकेचे १० तापाचे दवाखाने, रुक्मिणीबाई रुग्णालय, शास्त्रीनगर रुग्णालय आणि टाटा आमंत्रा येथील रुग्ण यांची कोविड तपासणी महापालिकेमार्फत मोफत करण्यात येत असल्याची माहिती पालिका  आयुक्तांनी यावेळी दिली.
 
मेट्रोपोलिस लॅबने देखील १० हजार टेस्ट मोफत करुन देण्याचे कबूल केले आहे. तसेच महात्मा फुले आरोग्य योजना सामंजस्य करार केलेल्या तीन दवाखान्यांनाही लागू करण्यात आलेली आहे. पॉझिटिव्ह रुग्णाच्या हायरिस्क कॉन्टॅक्टची तपासणी केली जाते आणि ९५ टक्के केसेस आयसोलेट केलेल्या व्यक्तींमधून सापडतात. महापालिका क्षेत्रातील खाजगी रुग्णालयांनी त्यांच्याकडे रुग्ण आल्यावर त्याची तपासणी करावी सदर रुग्णांमध्ये लक्षणे आढळून आली तरच असा रुग्ण महापालिकेकडे संदर्भित करावा आणि त्यांचे रुग्णालयात विलगीकरणासाठी जागा निश्चित करावी अशा सूचना रुग्णालयांना दिल्याचे आयुक्तांनी सांगितले.
 
रुग्णवाहीकांचा तुटवडा जाणवत असल्यामुळे महानगरपालिकेने आर.टी.ओ.कडे १०० रुग्ण वाहिकांची मागणी केली असून प्रत्येक प्रभागात १० रुग्णवाहीका उपलब्ध रहातील तसेच सदर रुग्णवाहीकांवर व्हेईकल ट्रॅकींग सिस्टिम बसविली जावून त्यासाठी एक हेल्पलाईन नंबर दिला जाणार असल्यामुळे रुग्णवाहीका कुठे कार्यरत आहे याची माहिती/लोकेशन मिळू शकेल. या व्यतिरिक्त महापालिका परिवहन सेवेच्या दोन मिनीबसचे रुपांतर रुग्णवाहीकेत करण्यात आले असून अशा एकुण १० मिनीबसचा वापर रुग्णवाहीका म्हणून करण्याचा महापालिकेचा प्रयत्न आहे. महापालिका पथकांमार्फत घरोघरी सर्व्हेक्षणाचे काम सुरु असून सुमारे  ८.३० लाख नागरीकांचे सर्व्हेक्षण केले असल्याचे आयुक्तांनी सांगितले.
 
महापालिकेने २४X७ यावेळेत वॉर रुम स्थापन केली असून यातील हेल्‍पलाईन क्रमांकाद्वारे लोकांना सर्व प्रकारची माहिती पुरविली जाते. जीआयएस मॅपिंग प्रणालीद्वारे चार कोविड रुग्णालयांमधील बेड्स ची उपलब्धता, दाखल झालेल्या व डिस्चार्ज झालेल्या रुग्णांची आकडेवारी, हॉट्सपॉट एरियाबाबतची माहिती डॅशबोर्डद्वारे दर्शविली जात असल्याची माहिती पालिका आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशी यांनी दिली.