कल्याण डोंबिवलीतील प्रभाग रचनेचे प्रस्ताव तयार करण्यास निवडणूक आयोगाची मंजूरी

कल्याण : कोरोनामुळे बहुतांश निवडणुका पुढे ढकलल्या असताना येत्या नोव्हेंबर महिन्यात असणाऱ्या कल्याण डोंबिवली महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुक ठरलेल्या वेळेत होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. राज्य

कल्याण : कोरोनामुळे बहुतांश निवडणुका पुढे ढकलल्या असताना येत्या नोव्हेंबर महिन्यात असणाऱ्या कल्याण डोंबिवली महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुक ठरलेल्या वेळेत होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. राज्य निवडणूक आयोगाने कल्याण डोंबिवली महापालिकेला एक पत्र पाठवले असून प्रभाग रचनेचे प्रस्ताव बनवण्यास त्याद्वारे मंजुरी दिली आहे. कल्याण डोंबिवली महापालिकेची मुदत नोव्हेंबर २०२० ला संपत आहे. त्यामुळे प्रभाग रचनेचा कार्यक्रम हा एप्रिल अथवा मे २०२० या कालावधीत होणे आवश्यक होते. डोंबिवली महापालिकेतील २७ गावांपैकी १८ गावांची नगरपरिषद आणि ९ गावे महापालिकेत ठेवण्याचा निर्णय काही दिवसांपूर्वीच राज्य सरकारने घेतला आहे. मात्र अजूनही त्यासंदर्भात कोणतीही अधिसुचना पालिकेला प्राप्त झालेली नसल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.

गेल्या ३ महिन्यांपासून कोरोनापाठोपाठ आलेले लॉकडाऊन साधारणपणे ३ आठवड्यांपूर्वी शिथिल करण्यात आले. अनलॉक १ च्या मिशन बिगीन अगेनअंतर्गत विविध अटी शर्तीचे पालन करून शासकीय कार्यालये खासगी कार्यालये, दुकाने सुरू करण्यास शासनाने परवानगी दिली आहे. त्याअंतर्गतच राज्य निवडणूक आयोगाने कल्याण डोंबिवली महापालिकेच्या प्रभाग रचनेचा प्रस्ताव तयार करण्यास केडीएमसीला मंजुरी दिली आहे. राज्य निवडणूक आयोगाचे उपसचिव अविनाश सणस यांनी याबाबत महापालिकेला पत्र पाठविले आहे. तर निवडणूक आयोगाकडून एक पत्र प्राप्त झाले असून त्याद्वारे प्रारूप माहिती तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्याची माहिती महापालिका सचिव संजय जाधव यांनी दिली आहे. एकीकडे कल्याण डोंबिवलीमध्ये कोरोनाचा उद्रेक झाला असताना पालिकेची निवडणूक घेणे कितपत योग्य ठरेल हे पाहावे लागेल.