आयाराम-गयारामांना २ वर्षे ताटकळत ठेवा! जितेंद्र आव्हाडांचा कानमंत्र

राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षाला रामराम ठोकून पद आणि सत्तेच्या स्थार्थापायी भाजपवासी झालेले अनेक माजी मंत्री, नेते आणि आमदार राष्ट्रवादीत येण्यास उत्सुक आहेत. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी असल्या आयाराम-गयारामांना 2 वर्षे ताटकळत ठेवा, असा कानमंत्र पक्षातील वरिष्ठांना दिला आहे.

    ठाणे (Thane).  राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षाला रामराम ठोकून पद आणि सत्तेच्या स्थार्थापायी भाजपवासी झालेले अनेक माजी मंत्री, नेते आणि आमदार राष्ट्रवादीत येण्यास उत्सुक आहेत. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी असल्या आयाराम-गयारामांना 2 वर्षे ताटकळत ठेवा, असा कानमंत्र पक्षातील वरिष्ठांना दिला आहे. राष्ट्रवादी ही काही खानावळ नाही, असंही ते म्हणाले. ठाणे जिल्ह्यातल्या अंबरनाथमध्ये झालेल्या कार्यकर्ता मेळाव्यात आव्हाड बोलत होते.

    कठीण काळात पक्षासोबत राहणाऱ्यांना प्राधान्य
    2014 साली राज्यात सत्तांतर झाल्यानंतर अनेक कार्यकर्ते राष्ट्रवादी सोडून भाजपात गेले, ते आता राष्ट्रवादीत पुन्हा येण्यासाठी धडपड करतायत. काहींनी प्रवेशही केलाय. मात्र जे कार्यकर्ते कठीण काळात पक्षासोबत खंबीरपणे उभे होते, त्यांनाच पक्ष पहिलं प्राधान्य देईल, असं आव्हाड म्हणाले. कार्यकर्त्यांना पक्षात घ्या, पण त्यांना किमान दोन वर्ष कुठलंही पद देऊ नका. सत्तेच्या सावलीसाठी जे तिकडे गेले त्यांना आता परत सत्तेच्या सावलीत याचचं असेल, तर आधी चटके सोसू द्या. कारण राष्ट्रवादी काँग्रेस ही काही खानावळ नाहीये, असं परखड मत जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केलं. ही सत्ता आणण्यासाठी पवार साहेबांनी मोठे परिश्रम आणि त्याग सोसल्याचंही ते म्हणाले.

    गणेश नाईक यांच्यावर बोचरी टीका
    राष्ट्रवादीतून भाजपमध्ये गेलेल्या गणेश नाईक यांच्यावरही जितेंद्र आव्हाड यांनी नाव न घेता बोचरी टीका केली. पूर्वीचं जिल्ह्यातलं नेतृत्व आणि आत्ताचं नेतृत्व यांच्यात फरक आहे. आत्ताचं नेतृत्व कुणाच्याही घरी मटण भाकरी खायला जाणार नाही. जाईल तर आपल्याच कार्यकर्त्यांच्या घरी जाईल. त्यामुळं जिल्ह्यातलं जेवणाचं राजकारण बंद झाल्याचं जितेंद्र आव्हाड म्हणाले. यातून त्यांनी गणेश नाईक यांच्यावर अप्रत्यक्षपणे निशाणा साधल्याची चर्चा यानंतर रंगली होती.