भिवंडी महानगरपाालिकेच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या भ्रष्ट कारभाराची चौकशी करा – खालिद गुड्डू यांची मागणी

भिवंडी: भिवंडी शहरात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येला आळा घालण्यासाठी मनपा प्रशासन पूर्णतः फेल ठरले असून मनपाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या भ्रष्ट व दुर्लक्षित कारभारामुळे शहरात अनेक नागरिकांना

 भिवंडी: भिवंडी शहरात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येला आळा घालण्यासाठी मनपा प्रशासन पूर्णतः फेल ठरले असून मनपाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या भ्रष्ट व दुर्लक्षित कारभारामुळे शहरात अनेक नागरिकांना आपला जीव गमवावा लागत आहे. मात्र मनपाचे वैद्यकीय अधिकारी स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी अशा महामारीत देखील भ्रष्टाचार करून नगरीकांच्या मृत्यूस जबाबदार ठरत असून या भ्रष्ट व हलगर्जी वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या भ्रष्ट कारभाराची चौकशी करावी व दोषी आढळल्यास त्यांच्या विरोधात कठोर कारवाई करावी, अशी मागणी एमआयएमचे भिवंडी शहराध्यक्ष खालिद गुड्डू यांनी भिवंडीचे पोलीस उपायुक्त राजकुमार शिंदे यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे. 

भिवंडी निजामपुर शहर महानगरपालिकेच्या कार्यकक्षेत असलेले स्व. इंदिरा गांधी रुग्णालय हे महाराष्ट्र शासनाने ताब्यात घेऊन सदर रुग्णालयास उपजिल्हा रुग्णालय म्हणून दर्जा दिलेला आहे परंतु, कोरोना महामारी संसर्गजन्य रोगाच्या उपचारासाठी सदर संपूर्ण रुग्णालय हे कोविड रुग्णालय म्हणून घोषित करुन त्याचे व्यवस्थापन मनपा प्रशासनतर्फे केले जात आहे. मनपाचे वैद्यकिय अधिकारी डॉ.जयवंत धुळे हे वैद्यकीय अधिकारी असल्याने सदर कोविड रुग्णालयाचे व्यवस्थापन त्यांच्या हाती आलेले आहे. मात्र डॉ.जयंवत धुळे यांची शैक्षणिक पात्रता एम.बी.बी.एस. असुन ते आपल्या सदर पदवी बरोबरच डी.सी.एच पदवीचा सुध्दा उल्लेख करतात परंतु त्याच्याकडे डी.सी.एचची शैक्षणिक पात्रता नसल्याचा थेट आरोप एमआयएमचे शहराध्यक्ष खालिद गुड्डू यांनी आपल्या लेखी निवेदनात केला आहे. दरम्यान डॉ.जयवंत धुळे यांची वैदयकीय अधिकारी म्हणून नेमणुक होण्यापूर्वी ते महानगरपालिकेच्या पाच प्राथमिक आरोग्य केंद्रापैकी प्रभाग समिती क्रं. ३ च्या कार्यक्षेत्रामध्ये असलेल्या पद्मानगर येथील आरोग्य केंद्रामध्ये वैद्यकीय अधिकारी म्हणून कामकाज पाहत होते मात्र महानगरपालिकेचे वैद्यकीय अधिकारी म्हणून नियुक्ती मिळण्यासाठी त्यांनी महानगरपालिकेचे तत्कालीन महापौर जावेद दळवी यांच्याशी हात मिळवणी करून मनपा वैद्यकीय अधिकारी म्हणून नियुक्ती होण्यासाठी तत्कालीन महापौरास पैसे दिले असल्याचा आरोप देखील खालिद गुड्डू यांनी केला आहे. मनपाच्या तत्कालीन वैद्यकीय अधिकारी डॉ विद्या शेट्टी यांच्याविरोधात तत्कालीन महापौर दळवी यांनी खोटे व खोडसाळपणाचे आरोप करुन लेखी तक्रारी अर्ज दिले होते आणि त्यांनी प्रशासनावर दबाव टाकुन आपल्या पदाचा गैरवापर करुन मनपा प्रशासनाकडून सदर वैद्यकीय अधिकरी डॉ विद्या शेट्टी यांच्याकडून वैद्यकीय अधिकारी पदाचा पदभार काढून घेतला आणि तिच्याजागी डॉ.जयवंत धुळे यांची नियुक्ती केली. ही नियुक्ती करण्यासाठी तत्कालीन महापौर यांना डॉ जयवंत धुळे यांनी पैश्याची लाच देऊन डॉ जयवंत धुळे यांनी मनपाच्या मुख्य वैद्यकीय अधिकारी पद लाटले असल्याचा आरोप खालिद गुड्डू यांनी केला आहे.
 
कोविड – १९ संसर्गजन्य महामारी पूर्वीच डॉ धुळे यांनी भ्रष्ट मार्गाने वैद्यकीय विभागात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला असल्याचा आरोप देखील खालिद गुड्डू यांनी केला आहे. मनपाच्या वरिष्ठ नगरसेवक व अधिकाऱ्यांशी डॉ धुळे यांचे आर्थिक हितसंबंध असल्यानेच मनपा प्रशासन डॉ धुळे यांच्या विरोधात भूमिका घेत नसल्याची खंत व आरोप देखील गुड्डू यांनी आपल्या निवेदनात केला आहे.  कोरोना महामारीत शासकीय रुग्णालय सुविधा व विलगीकरण केंद्राच्या सुविधा पुरविण्याच्या नावे डॉ जयवंत धुळे मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करत असल्याचा आरोप खालिद गुड्डू यांनी केला आहे. त्यातच डॉ.जयवंत धुळे वैद्यकीय अधिकारी म्हणून काम करण्याचा कोणताही अनुभव व योग्य ती शैक्षणिक पात्रता नसल्याने कोरोनाबाधित आजाराने मृत्यू होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण फार मोठया प्रमाणात शहरात वाढलेले आहे. तर विलगीकरण केंद्रामध्ये असलेल्या नागरिकांना निकृष्ट दर्जाचे जेवण दिले जात आहे मात्र प्रति इसमास दरदिवशी रुपये ५२० प्रमाणे जेवनाचे बिल ठेकेदारांस अदा केले जात आहे. यामध्ये देखील मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत आहे. या ठिकाणी दिले जाणारे जेवण हे केवळ ७० ते ८० रुपयांपेक्षा जास्त असु शकत नाही असे असतांना सुध्दा फार मोठया प्रमाणात भ्रष्टाचार करुन प्रति इसमास दरदिवशी रुपये ५२० प्रमाणे देयक अदा केली जात असल्याचा आरोप खालिद गुड्डू यांनी केला आहे.
कोरोनाबाधितांच्या तपासणी अहवालात दवखील मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असून महानगरपालिकेने भिवंडीतील ऑरेंज रुग्णालय हे प्रसुती व इतर आजारावर औषधोपचार करण्यासाठी ताब्यात घेतलेले आहे आणि त्यामध्ये सुध्दा सदर वैद्यकीय अधिकारी फार मोठा भ्रष्टाचार करीत आहेत. सदर ऑरेंज रुग्णालयातील काम करणाऱ्या खाजगी कर्मचा-यांचा पगार मनपा प्रशासनातर्फे दिला जात आहे आणि त्यामध्येसुध्दा फार मोठा प्रमाणामध्ये भ्रष्टाचार केला जात आहे. सदर ऑरेंज रुग्णालयामध्ये स्व.इंदिरा गांधी रुग्णालयाचा कर्मचारीवर्ग जर कामाला लावले असता, मनपा प्रशासनास सदर ऑरेंज रुग्णालयातील खाजगी कर्मचा-यांना पगार देणे भाग पडले नसते परंतु भ्रष्टाचार रुपाने पैसा मिळावा म्हणून सदर डॉ. जयवंत धुळे ह्यांनी तशी व्यवस्था केलेली असून कोविड रुग्णालयासाठी व विलगीकरण केंद्रामध्ये काम करणाऱ्यांना डॉक्टर व कर्मचाऱ्यांना त्यांच्या स्वसरंक्षणासाठी आवश्यक ते सर्व साहित्य जसे मास्क, पी.पी.ई किट, सॉनिटाजर व हँडग्लोव्हज इत्यादी वस्तु खरेदी करण्यासाठी फार मोठा भ्रष्टाचार करीतअसून डॉ.जयवंत धुळे हे पुरवठा करणाऱ्या ठेकेदाराकडून फार मोठा रक्कमेची लाच स्विकारली जात आहे आणि निकृष्ट दर्जाचे साहित्य दोनशे ते तिनशेच्या जास्त पटीत विकत घेतले जात असल्याने या सर्व गैरकारभाराची चौकशीची मागणी खालिद गुड्डू यांनी पोलीस उपायुक्त यांच्या कडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
महत्वाचे म्हणजे आय.जी.एम. कोविड रुग्णालयामध्ये महाराष्ट्र शासनाने आठ व्हेंटिलेटर दिलेले आहेत आणि त्यापैकी चार व्हेंटीलेटर कार्यरत आहे आणि उरलेले चार हे बंद आहेत आणि ते हाताळण्यासाठी शैक्षणिक पात्रता व अनुभव असलेले ऑपरेटर सुध्दा नाहीत. सदर शंभर बेडच्या कोविड रुग्णालयामध्ये कमीत कमी एकावेळेस २०० ऑक्सीजन सिलेंडरचा साठा राहणे आवश्यक आहे. परंतु सदर रुग्णालयामध्ये तीस ते पस्तीस सिलेंडरचा साठा ठेवला जात आहे कारण की, डॉ.जयवंत धुळे यांना कोणत्याही प्रकारचा रुग्णालय व्यवस्थापनाचा अनुभव व शैक्षणिक पात्रता नाही. कोरोना आजारावर औषधोपचार करण्यासाठी सदर वैद्यकीय अधिकारी डॉ.जयवंत धुळे यांच्या शिफारशीवरुन अल मोमीन हॉस्पिटल, काशिनाथ हॉस्पिटल, एस.एस हॉस्पिटल, अंटलाटा हॉस्पिटल व वेद हॉस्पिटल ह्या खाजगी रुग्णालयांची नियुक्ती केलेली आहे आणि सदर खाजगी रुग्णालय हे रुग्णांकडून फार मोठी रक्कम घेऊन औषधोपचार करीत आहेत आणि त्या रक्कमेमध्ये सुध्दा डॉ.जयवंत धुळे यांना कमिशन च्या माध्यमातून फार मोठे कमिशन मिळत असून या खाजगी रुग्णालयांची नियुक्तीची शिफारशीसाठी सुध्दा त्यांनी सदर प्रत्येक खाजगी हॉस्पिटलाकडून दोन ते तीन लाख रुपयांची लाच घेतलेली असल्याचा आरोपही खालिद गुड्डू यांनी आपल्या निवेदनात केला आहे.
 
 शहरात कोरोनाबाधीतांची संख्या वाढण्यास डॉ जयवंत धुळे यांचा बेजबाबदार व भ्रष्ट कारभार तसेच मनपा प्रशासनाचा हलगर्जीपणा कारणीभूत असून सदर वैद्यकीय अधिकारी डॉ.जयवंत धुळे यांची कठोर चौकशी करून त्यांच्याकडून वैद्यकीय अधिकारी या पदाचा पदभार काढून घेवुन त्याच्या जागी अनुभवी वैद्यकीय उच्चशिक्षित एम.डी. पदवीधर असलेल्या वरिष्ठ डॉक्टरची वैद्यकीय अधिकारी म्हणून तातडीने नियुक्त करावी अशी मागणी खालिद गुड्डू यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व पोलीस उपायुक्त राजकुमार शिंदे यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.