स्थलांतरीत मजुरांची चार दिवस उपासमार, आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेचे दुर्लक्ष

मुरबाड: शासनाच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे मुरबाडच्या तळवली आश्रमशाळेत थांबलेल्या मजुरांची चार दिवसांपासून उपासमार सुरू आहे. लॉकडाऊनमुळे बुलढाण्याकडे निघालेले ६२ मजूर

 मुरबाड: शासनाच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे मुरबाडच्या तळवली आश्रमशाळेत थांबलेल्या मजुरांची चार दिवसांपासून उपासमार सुरू आहे. लॉकडाऊनमुळे बुलढाण्याकडे निघालेले ६२ मजूर मुरबाडमध्ये अडकून पडले आहेत. त्यांची राहण्याची कोणतीही सोय प्रशासनाने न केल्याने त्यांना आश्रमशाळेत आसरा मिळाला आहे. गेला महिनाभर आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेकडून त्यांना अधून मधुन जेवणाची सोय झाली. मात्र गेल्या चार दिवसांपासून त्यांच्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याने हे मजूर व त्यांची लहान मुले उपाशी आहेत, त्यामुळे या असहाय मजुरांनी टोकावडे पोलीस ठाणे गाठून पोलिसांकडे मदतीची याचना केली आहे.

स्थानिक प्रशासन यंत्रणा कोणतेही लक्ष देत नाही,  त्यामुळे आम्हाला गावी जाऊन द्यावे, आम्ही गावाकडून गाडी मागवून घेऊन त्यामधून घरी जाऊ, अशी विनंती हे मजुर करत आहेत, मात्र आम्ही सांगू त्याच वाहनाने जाता येईल, त्यासाठी प्रतिमाणसी सतराशे रुपये गाडी भाडे द्यावे लागेल, असे उत्तर तहसीलदारांनी त्यांना दिल्याचे या मजुरांनी सांगितले. मजुरांच्या खिशातील उरली सुरली रक्कम लॉकडाऊनमध्ये संपली आहे. आता खिशात फुटकी दमडी नाही, त्यामुळे घरी जाणार कसे, ही व्यथा मजुरांनी बोलून दाखवली.