मजुरांच्या स्थलांतरामुळे अनेक कामांसाठी जाणवतेय काम करणाऱ्यांची कमतरता

कल्याण : कोरोनामुळे लॉकडाऊन असल्याने अत्यावश्यक सेवा, जीवनावश्यक वस्तुंची दुकाने वगळता सारे काही संचारबंदी, जमावबंदीमुळे ठप्प झाले होते. मात्र ५ जुनपासुन शिथिलता आणल्याने दुकाने उघडली बाजार

 कल्याण : कोरोनामुळे लॉकडाऊन असल्याने अत्यावश्यक सेवा, जीवनावश्यक वस्तुंची दुकाने वगळता सारे काही संचारबंदी, जमावबंदीमुळे ठप्प झाले होते. मात्र ५ जुनपासुन शिथिलता आणल्याने दुकाने उघडली बाजार पेठेत खरेदी करण्यासाठी रेलचेल वाढली. मात्र पावसाळ्याच्या तोंंडावर घराच्या छपराच्या डागडुजीला मजूर मिळणे कठीण झाले आहे. कोरोनाच्या धास्तीने लाखो मजुरांनी मूळगावी स्थलांतर केल्याने नाका कामगारासह,सर्वच क्षेत्रात मजुरांची कमतरता भासू लागली आहे. याचा परिणाम, बांधकाम क्षेत्रासह, कारखाने, लघुउद्योग यांना बसत आहे.

सरकारी विकासकामांना देखील कंत्राटदारांना मजुर मिळत नसल्याने सरकारी विकासकामाचा वेग मंदावला आहे. लॉकडाऊनमुळे, दुरुस्तीअभावी बंद पडलेल्या इलेक्ट्रॉनिक्स वस्तु, गुह उपयोगी वस्तू दुरुस्तीसाठी कुशल कारागिरांची कमतरता भासत आहे. तर नळकारागीर, वायरमन, गवंडी,बिगारी, रंगारी, इलेक्ट्रॉनिक वस्तू मॅकॅनिक, कंत्राटी कामगार यांची कमतरता भासत असल्याने मजुरी वाढवून मजुर मागत असल्याने सर्वसामान्य माणूस मात्र हवालदिल झाला आहे.
 
 शेतकऱ्यांचा खरीप पेरणीचा हंगाम सुरु झाला असला तरी कोरोना व्हायरसचा संकटामुळे मजुरांचा तुटवडा भासत असल्याचे काही शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे मजुर मिळतात की नाही यामुळे शेती व्यवसायावरदेखील परिणाम दिसेल, असे चित्र सद्यस्थितीत दिसत आहे. बाजारपेठा उघडल्या तरी मार्केटमधील कामगार अजून दुकानामध्ये कामासाठी हजर न झाल्याने येथेही मजुरांची कमतरता भासत असल्याचे दुकान मालक सांगत आहेत. तर हातावर पोट असणाऱ्या स्थानिक मजुरांनी लॉकडाऊनमध्ये भाजीपाला, फळ विक्री ,असे छोट्या व्यवासयाकडे वळल्याने मजुर संख्येत घट झाल्याचे समोर येत आहे. मालाची आवक जावक असणाऱ्या ठिकाणीदेखील मजूर स्थालंतरित झाल्याचा फटका बसत आहे. मजूर क्षेत्रात  रोजगार निर्माण झाला असला तरी त्या त्या क्षेत्रातील मजुराची काम करण्याची लकब, सवय यांची नवीन मजूर म्हणून काम करणाऱ्याच्या अंगवळणी पडण्यास वेळ लागेल, हे यानिमित्ताने चित्र दिसत आहे.