Lack of transport system in Divya

ठाणे : ठाण्यातील दिवा येथे स्वस्तात मिळणाऱ्या घरांमुळे झपाट्याने नागरी वस्तीत वाढ झालेली आहे.  दिव्याची आजची लोकसंख्या ४ ते ५ लाखाच्या आसपास आहे.  दिव्याची लोकसंख्या वाढलेली असली तरीही दिव्यात मूलभूत सुविधांचा अभाव आहे. दरम्यान वाढत्या लोकसंख्येमुळे वाहनांची संख्याही मोठी आहे. वाहनांच्या गर्दीत सुस्थितीत नसलेल्या रस्त्यांमुळे रस्त्यावर चालतानाही दिववासीयांची घुसमट होते.

वाहनांच्या गर्दीला शिस्त नसल्याने नेहमीच हा परिसर गजबजलेला असतो. वाहतुकीवर नियमन करण्यासाठी  वाहतूक पोलिसच नसल्सयाचे समोर आले आहे.

दिवा पूर्व रेल्वे फाटक ते अगदी शिळफाटा पर्यंत रस्त्याची दुरावस्था असून वाहनांची वर्दळ, उडणारी धूळ, पाणी टंचाई  त्यातच वाहतूक नियमनासाठी नसलेले वाहतूक पोलीस, रस्त्यावर बसलेले फेरीवाले, अशा विविध समस्यांच्या गर्तेत अडकलेले दिवा समस्या मुक्त होणार कधी ? यासाठी अनेक राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटना दिव्प्रयाच्यया विकासासाठी प्रयत्नशील आहेत.

थोडक्यात दिव्यात “कायद्याचे” राज्य नसून यंत्रणेच्या अभावाने ” काय द्यायचे” चे राज्य असल्याचे चित्र आहे. वाहतूक पोलीस नसल्यामुळे दिव्याच्या वाहतुकीकोंडी कधी न सुटणारा प्रश्न आहे. शिळफाटा परिसरातून आत मध्ये दिव्याकडे वाटचाल करताना अगदी दिवा स्टेशन फाटकापर्यंत एकही वाहतूक पोलीस  दृष्टीस पडत नाही. त्यामुळे रस्त्यावर रिक्षा आणि इतर वाहनांचा मनमानी कारभार सुरु आहे.

दिव्यातील गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी दिव्याला स्वतंत्र पोलीस ठाणे द्या अशी मागणी अनेक संस्थांनी केली. मात्र, अद्याप उपलब्धता झालेली नाही.  तर, वाहतूक पोलीस औषधालाही सापडत नसल्याने वाहतूक नियमांच्या तीन तेरा वाजलेले आहेत.

कोरोनाच्या काळातही रिक्षाचालक चार -पाच प्रवासी वाहतूक राजरोसपणे करीत आहेत. वाहतूक पोलिसांच्या उपस्थितीमुळे किमान बेशिस्त रिक्षा वाहतुकीलाही शिस्त लागेल आणि नागरिकांची घुसमट थांबेल असा विश्वास दिवावासी व्यक्त करीत आहेत.