डरकाळ्या फोडणारा, आजारी बिबट्या अखेर वनविभागाच्या ताब्यात

बुधवारी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास पुन्हा त्या बिबट्याच्या शोध मोहिमेला सुरुवात झाल्यावर ९ वाजण्याच्या सुमारास आजारी बिबट्या झाडीमध्ये बसल्याचे वनविभाग अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले. त्यातच बिबट्याची हालचाल मंदावल्याचे दिसून आले. यावेळी, बिबट्या मोठमोठ्याने डरकाळी फोडून एका जागेवरून दुसऱ्या जागेवर आश्रय घेण्याचा प्रयत्न करत होता.

ठाणे : येऊर येथे मंगळवारी दिसलेला बिबट्या बुधवारी सकाळी वनविभागाच्या जाळयात सापडला. त्या बिबट्याला जुलाब, ताप व अन्न न मिळाल्याने अशक्तपणा आल्याचे प्राथमिक तपासणीत समोर आले आहे. त्याच्यावर प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी बोरिवली वन्यजीव बचाव केंद्र येथे नेण्यात आल्याची माहिती वनविभागाने दिली.

येऊर लाईट हाऊस हॉटेलच्या पाठीमागे एक बिबट्या जखमी अवस्थेत असल्याबाबतची तक्रार वन विभागाच्या नियंत्रण कक्षात मंगळवारी सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास आली होती. त्यानुसार वन विभागाच्या बचाव पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. यावेळी बिबट्याचा चालताना तोल जात असल्याचे व काही अंतर जाऊन परत जागेवर बसत असल्याचे सांगण्यात आले. बचाव पथकाची शोध मोहिम सुरू असताना काळोख पडल्याने व बिबट्या हा पूर्णपणे शुद्धीत असल्याने तसेच आक्रमक होऊन प्रति हल्ला करण्याची दाट शक्यता व्यक्त करत वनविभागाने शोध मोहिम थांबवली.

तो बिबट्या हा नर असून अंदाजे त्याचे वय दोन वर्ष असावे. तसेच तो आक्रमक असल्याने त्याला इंजेक्शन देत बेशुद्ध केले. प्राथमिक तपासणीत बिबट्याला जुलाब, ताप आणि अन्न न मिळाल्याने त्याला अशक्तपणा आला असावा. त्याला पुढील उपचारासाठी बोरिवली वन्य जीव बचाव केंद्र येथे पाठवले आहे.

राजेंद्र पवार, वन अधिकारी, येऊर परिक्षेत्र

बुधवारी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास पुन्हा त्या बिबट्याच्या शोध मोहिमेला सुरुवात झाल्यावर ९ वाजण्याच्या सुमारास आजारी बिबट्या झाडीमध्ये बसल्याचे वनविभाग अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले. त्यातच बिबट्याची हालचाल मंदावल्याचे दिसून आले. यावेळी, बिबट्या मोठमोठ्याने डरकाळी फोडून एका जागेवरून दुसऱ्या जागेवर आश्रय घेण्याचा प्रयत्न करत होता.

याचदरम्यान पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्या बिबट्याला भुलीचे इंजेक्शन देत बेशुद्ध केले. त्यानंतर बचाव पथकाने त्याला ताब्यात घेतले. प्रत्यक्ष पाहणी तो बिबट्या हा आजारी असल्याचे वन विभागाने स्पष्ट केले. ही मोहीम बोरिवली संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे सहायक वनसंरक्षक दिगंबर दहिबावकर, पशुवैद्यकीय अधिकारी शैलेश पेठे, बोरिवली बचाव पथकाचे विजय भारवदे, येऊर परिक्षेत्राचे वन अधिकारी राजेंद्र पवार आणि कर्मचारी यांनी यशस्वी पार पडली.