गटई कामगारांना ५ हजारांची आर्थिक मदत द्या- राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे मुख्यमंत्र्यांना पत्र

कल्याण : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे प्रतिबंधात्मक उपाय म्हणून देशात लॉकडाऊन सुरु आहे. या लॉकडाऊनचा परिणाम चर्मकार समाजातील दुर्लक्षित असलेला व हातावर पोट भरणारे गटई कामगार यांच्यावर

 कल्याण : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे प्रतिबंधात्मक उपाय म्हणून देशात लॉकडाऊन सुरु आहे. या लॉकडाऊनचा परिणाम चर्मकार समाजातील दुर्लक्षित असलेला व हातावर पोट भरणारे गटई कामगार यांच्यावर झालेला आहे. दररोज काम केल्यानंतर अन्नाचा घास मिळविणाऱ्यांवर हाताला काम नसल्याने आज आर्थिक अडचणीत सापडला असून त्यांच्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे. त्यामुळे या गटई कामगारांना ५ हजारांची  आर्थिक मदत करण्याची मागणी राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे कल्याण शहर अध्यक्ष रुपेश भोईर यांनी मुख्यमंत्र्यांकडे  पत्राद्वारे केली आहे.  

सध्याची परिस्थिती पाहता आणखी किती दिवसांमध्ये परिस्थिती आटोक्यात येईल हे सांगता येत नाही. त्यामुळे अनिच्छित कालावधीसाठी त्यांचा स्वतःचा व कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे जिकरीचे होऊन बसले आहे. गटई कामगारांना शासनाने अधिकृत स्टॉल वितरित केले आहेत अशा गटई कामगारांची सर्व यादी माहितीसह समाज कल्याण आयुक्त, पुणे  तसेच संत रोहिदास चर्मकार व चर्मविकास महामंडळ, ठाणे यांच्याकडे उपलब्ध आहे त्या आधारे तसेच महिला समृद्धी योजनेमधील महिलांची यादी माहितीसह मा.समाज कल्याण अधिकारी, ठाणे यांच्या उपलब्ध आहे. या संकटकाळी नोंदणीकृत गटई कामगार तसेच महिला समृद्धी योजनेमधील महिलांना कुटुंबियांच्या उदरनिर्वाहाकरिता थेट ५ हजार रुपये यांच्या खात्यात जमा करून त्यांना व त्यांच्या कुटुंबियांना दिलासा देण्याची मागणी राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे कल्याण शहर अध्यक्ष रुपेश भोईर यांनी  मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे केली आहे. तर याबाबत कल्याण पूर्वचे आमदार गणपत गायकवाड यांनी देखील या मागणीचे पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवले आहे. दरम्यान गटई कामगारांना सरकारी आर्थिक मदत येई पर्यंत त्यांच्या पोटापाण्याचा प्रश्न सुटावा म्हणून  राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे कल्याण शहर अध्यक्ष रुपेश भोईर यांनी ठाणे जिल्हाध्यक्ष सुरेश पवार आणि कल्याण डोंबिवली जिल्हाध्यक्ष राम बनसोडे यांच्या सहकार्याने अन्नधान्य वाटप करण्यात आले.