bogus TC

अशरफ हा एलआयसी एजंट आहे. (LIC Agent became bogus TC) धंदा ठप्प पडल्याने तो आर्थिक विवंचेनेत होता.

    कल्याण : लॉकडाऊनमुळे एलआयसी एजंटचा(LIC Agent) व्यवसाय ठप्प पडला त्यातच दोन दिवसापूर्वीच या एजंटला स्टेशनवर टीसीने विदाऊट तिकीट पकडले. यातूनच या एजंटला कल्पना सुचली. त्याने बोगस आयकार्ड पावती बुक तयार करुन टीसीचे काम सुरु केले. मात्र पहिल्या दिवशीच तो रेल्वे पोलिसांच्या तावडीत सापडला. अखेर अशरफ अली या एलआयसी एजंटला रेल्वे पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

    कल्याण रेल्वे पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस कर्मचारी राजू आखोडे आणि त्यांचे काही सहकारी कल्याण रेल्वे स्टेशनवर गस्त घालत असताना त्यांची नजर एका टीसीवर गेली. काळा कोट आणि पांढरा शर्ट हाती पावती बूक घेऊन हा टीसी प्रवाशांची तिकीट तपासणी करीत होता. त्याचे हावभाव पाहून पोलिसांना संशय आला. अखेर पोलिसांनी एका टीसीला पाचारण केले. त्या टीसीसोबत पोलिसांनी या व्यक्तिची विचारपूस सुरु केली. काही वेळात हे समोर आले की, हा बोगस टीसी आहे. कल्याण रेल्वे पोलिसांनी या बोगस टीसीला ताब्यात घेतले आहे.

    अशरफ अली असे या व्यक्तीचे नाव असून तो मुंबई येथील भांडूप येथे राहतो. अशरफ हा एलआयसी एजंट आहे. धंदा ठप्प पडल्याने तो आर्थिक विवंचेनेत होता. दोन दिवसापूर्वी तो काही कामानिमित्त जात असताना इगतपूरी स्टेशनला अशरफ अलीला एका टीसीने पकडले. त्याच्याकडे तिकीट नसल्याने त्याला दंड ठोठावला. या घटनेतून त्याला युक्ती सुचली.

    त्याने गुगलच्या सहाय्याने बोगस आयकार्ड तयार केला. त्याच्याकडे दंडात्मक कारवाई ज्या टीसीने पावती फाडली होती. त्याच पावतीच्या आधारे बोगस पावती पूस्तक तयार केले. टीसीचे कपडे परिधान करुन कल्याण स्थानकात पोहचला. पहिल्या दिवशीच त्याच्या या कृत्याचा पर्दाफाश झाला आणि तो पकडला गेला असल्याचे कल्याण रेल्वे पोलीस ठाण्याच्या महिला पोलीस निरिक्षक अर्चना दुसाने यांनी सांगितले.