लॉकडाऊनमुळे रिक्षा चालकांवर कर्जबाजारी होण्याची वेळ

डोंबिवली : लॉकडाऊनमुळे रिक्षा चालकांना व्यवसाय बंद करण्याशिवाय पर्यायच राहिला नाही. रिक्षा व्यवसाय म्हणजे दिवसभर काम केल्यानंतरच घरात चूल पेटते. या व्यवसायात भाड्याने रिक्षा चालवणाऱ्यांची अवस्था

डोंबिवली : लॉकडाऊनमुळे रिक्षा चालकांना व्यवसाय बंद करण्याशिवाय पर्यायच राहिला नाही. रिक्षा व्यवसाय म्हणजे दिवसभर काम केल्यानंतरच घरात चूल पेटते. या व्यवसायात भाड्याने रिक्षा चालवणाऱ्यांची अवस्था अधिकच वाईट आहे. शहरात विविध ठिकाणी जाणारे रिक्षा स्टँड आहेत. अशा प्रत्येक रिक्षा स्टँडवर कर्ज देणारे अनेक सावकार असल्याची माहित रिक्षा चालकांना असते. कोरोनामुळे रिक्षाचालकांवर आलेल्या समस्येचा फायद सावकार घेण्याची शक्यता रिक्षा चालक व्यक्त करीत आहेत. बऱ्यापैकी पैसा बाळगणारे विविध क्षेत्रातील सावकार (शेट) यांचा हा प्रमुख उद्योग आहे.

स्वत:चे घर असलेले रिक्षा चालक फारच कमी आहेत. बहुतांश रिक्षा चालक भाड्याने खोली घेऊन राहतात. नविन रिक्षा असेल तर कर्जाचे हप्ते, विमा हप्ते, आरटीओ परवाना नूतनीकरण, पेट्रोलच्या वाढलेल्या किंमती, सुट्या भागांच्या वाढत्या किंमती, देखभाल-दुरूस्ती यामुळे हा व्यवसाय फारच अडचणीत आहे. त्यामुळे उसनवारी किंवा सावकाराकडून कर्जाऊ पैसे व्याजाने उचलावे लागतात. स्टँडवरील असे सावकार १०% व्याजाने हे पैसे ६० दिवसांच्या मुदतीवर दिले जातात. मात्र कर्जाची रक्कम देताना व्याज कापूनच रक्कम दिली जाते. कर्जाऊ रक्कम वसुल करण्यासाठी सावकारांची माणसे स्टँडवर उभी असतात. पैसे वेळेवर दिले नाहीतर, वेळप्रसंगी मानगुट धरतात. कर्ज घेणाऱ्या रिक्षाचालकाला सावकारांकडून एक कार्ड दिले जाते. यावर कर्जाची रक्कम, रोजचा हप्ता याची नोंद केली जाते. कोरोनामुळे रिक्षा फिरायची बंद झाल्यानंतर पोटाची खळगी भरण्याचा प्रश्‍न रिक्षा चालकांसमोर उभा राहिला आहे. अनेकांनी उदरनिर्वाहासाठी दहा हजार रूपयापर्यंत कर्जे काढून किराणा माल भरला आहे. भाजीपाला परवडत नसल्यामुळे भाकरी आणि आमटी-भात खाऊन जगण्याची वेळ आली आहे. उधारीवर किराणा माल मिळत नसल्यामुळे रोखीने जीवनावश्‍यक वस्तू खरेदी करायच्या तरी कशा? असा प्रश्‍न त्यांच्यासमोर आहे. दैनंदिन खर्च, घरभाडे, दवाखान्यातील खर्च, पोरांचा शिक्षणाचा खर्च, असा खर्च असताना फक्त रिक्षाच्या कमाईवर कुटुंबाचा उदरनिर्वाह चालविणे कठीण आहे. अश्यातच करोनाच्या संचारबंदीत रिक्षाचे चाक जायबंदी झाले. त्यामुळे कुटुंबाच्या उपजिविकेची काळजी करीत पुन्हा रिक्षाचालकाला कर्जासाठी नाईलाजाने स्टँडवरील त्या सावकाराकडेच हात पसरावे लागणार आहेत. आणि पुन्हा रिक्षा चालक कर्जबाजारी होणार आहे.