कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीत अंशत: लॉकडाऊन; जाणून घ्या काय सुरु आणि काय बंद ?

कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीत कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी आज (10 मार्च) आरोग्य आणि पोलीस प्रशासनाची तातडीची बैठक घेऊन आजपासून काही निर्बंध लागू केल्याचे जाहीर केले आहे.

  ठाणे (Thane).  कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीत कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी आज (10 मार्च) आरोग्य आणि पोलीस प्रशासनाची तातडीची बैठक घेऊन आजपासून काही निर्बंध लागू केल्याचे जाहीर केले आहे. या निर्बधांचे उल्लंघन केल्यास फौजदारी गुन्हे दाखल करण्याचा इशारा आयुक्तांनी दिला आहे.

  पोलिसांचाही इशारा
  महापालिका प्रशासनातर्फे घेण्यात आलेल्या बैठकीत आरोग्य खात्याच्या मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अश्वीनी पाटील, पोलीस उपायुक्त विवेक पानसरे, सहाय्यक पोलीस आयुक्त अनिल पोवार उपस्थित होते. या बैठकीपश्चात काही निर्बंध घालण्यात आले असल्याचे जाहीर करण्यात आले. महापालिकेने कोरोना काळात मास्क न घालता फिरणाऱ्यांच्या विरोधात महापालिकेकडून दंडात्मक कारवाई सुरु आहे. मात्र तरीदेखील लोक विनामास्क फिरत आहे. सोशल डिस्टसिंग पाळत नाही. कोरोना रुग्णांची संख्या वाढतेय ही चिंतेची बाब असल्याने काही कठोर निर्बंध घालण्यात आल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले. यावेळी पोलीस उपायुक्त पानसरे यांनीही नागरिकांनी नियमांचे पालन करावे. पोलिसांकडून कारवाई होऊन गुन्हा दाखल करण्याची वेळ आणू नये, असे सूचित केले.

  निर्बंध नेमके काय?
  दुकाने सकाळी 7 ते सायंकाळी 7 या वेळेत सुरु राहतील.
  शनिवार आणि रविवारी दुकाने पी-1 आणि पी-2 यानुसार खुली ठेवता येतील.
  खाद्य आणि शितपेयाच्या सर्व गाड्या रात्री 9 वाजेपर्यंत सुरु ठेवता येतील.
  भाजी मंडई 50 टक्के क्षमतेनुसार सुरु ठेवता येणार.
  लग्न आणि हळदी सभारंभ सकाळी 7 ते सायंकाळी 9 वेळेत आखून दिलेल्या मर्यादेनुसार करावे. अन्यथा वधू-वर आणि हॉल मालकाच्या विरोधात फौजदारी गुन्हा दाखल करणार.

  मद्यविक्री दुकानं, बार रात्री 11 वाजेपर्यंत सुरु राहणार. होम आयसोलेशन असलेले रुग्ण बाहेर फिरताना आढळून आल्यास कारवाई केली जाईल.
  उद्या महाशिवरात्री निमित्त शहरातील 62 शिवमंदीरे खुली राहतील. पण दर्शन घेता येणार नाही. सर्व आठवडी बाजार पूर्णत: बंद राहणार आहेत. पोळीभाजी केंद्रांना रात्री दहा वाजेपर्यंत सुरु ठेवण्याची मुभा देण्यात आली आहे.

  कल्याणमधील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या
  कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीत आज कोरोनाचे 392 नवे रुग्ण आढळून आले आहेत. उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 2360 आहे. उपचार घेऊन बरे झालेल्या एकूण रुग्णांची संख्या 61 हजार 896 आहे. गेल्या 24 तासात 169 रुग्ण उपचार घेऊन बरे झालेले आहे. आज एकाही रुग्णांचा मृत्यू झालेला नाही. मात्र कालच्या तुलनेत आज नव्याने आढळून आलेल्या रुग्णांची संख्या दुप्पट आहे. ही चिंतेची बाब आहे.