सफेद कांद्याला लॉकडाऊनचा फटका, शेकऱ्यांना भेडसावतोय कांदा साठवणुकीचा प्रश्न

नीता चौरे, पालघर : पालघर जिल्ह्यातल्या विक्रमगड तालुक्या मधल्या म्हसरोली या गावात, पाच ते सहा वर्षापासून खरीपातल्या भातपीकाच्या कापनीनंतर डिसेंबर महिन्यात सफेद कांद्याची लागवड केली जाते. या

 नीता चौरे, पालघर : पालघर जिल्ह्यातल्या विक्रमगड तालुक्या मधल्या म्हसरोली या गावात, पाच ते सहा वर्षापासून खरीपातल्या भातपीकाच्या कापनीनंतर डिसेंबर महिन्यात सफेद कांद्याची लागवड केली जाते. या कांद्याला वाढती मागणी आणि चांगली किंमत मिळत असल्यानं गेल्या काही वर्षांत या गावातल्या शेतकऱ्यांकडून सफेद कांद्याची लागवड मोठय़ा प्रमाणात केली जाऊ लागली आहे. 

ह्या वर्षी पालघर जिल्ह्यातल्या विक्रमगड तालुक्या पासुन जवळ असलेल्या मुंबई,वसई विरार, पालघर, नालासोपारा, भाईंदर अशा शहरांतून या कांद्याला होणारी मागणी लक्षात घेत म्हसरोली गावातल्या शेतकऱ्यांनी अधिक प्रमाणात सफेद कांद्याची लागवड यंदा केली आहे. मात्र कोव्हीड १९ आजाराच्या पार्श्वभूमीवर लागू झालेल्या लॉकडाऊनमुळे पिकविलेला शेतमालाची विक्री होत नसल्यानं शेतकरी संकटात आला आहे.

म्हसरोली, कुरंझे परीसरातल्या काही भागात मोठ्या प्रमाणात पिकविल्या जाणाऱ्या पांढऱ्या कांद्याला ही लॉकडाऊनचा फटका बसला असून बाजारपेठ बंद असल्यानं विक्रीसाठी तयार असणारा पांढरा कांदा सध्या शेतकऱ्यांच्या घरातच पडून आहे.

पालघर जिल्ह्यातल्या विक्रमगड तालुक्या मधल्या म्हसरोली गावात १०० ते ११० शेतकऱ्यां कडून यंदा  १८० ते २०० एकरा वर सफेद कांदाची लागवड करण्यात आली आहे.  यातून यंदा कांद्याचं चांगलं उत्पादन या एका गावातून येण्याची शक्यता गावातल्या शेतकऱ्यांनी व्यक्त केली. 

मात्र कोव्हीड २९ संसर्गजन्य आजारामुळे शेतकरी विक्रीस घेऊन जाणारी मुंबई, वसई-विरार, पालघर, नालासोपारा, भाईंदर सारखी शहरं लॉकडाऊनमुळे बंद आहेत. त्यामुळे कांदा विक्रीस नेता येत नसल्यानं शेतकऱ्यांना मोठं नुकसान सहन करावं लागणार आहे. 

गेल्या वर्षी सुरवातीला चांगल्या प्रतिचा कांदा उत्पादित झाल्यानं त्याला प्रतिमाळ ६० ते ७० रुपये इतका चांगला दर शेतकऱ्यांना मिळू शकला होता. मात्र कोरोनामुळे सर्वत्र  लॉकडाऊन असल्यानं प्रतिमाळ ४० ते ५० रुपये भाव मिळत असल्याचं शेतकऱ्यांनी सांगितलं.

दरम्यान पांढऱ्या कांद्याच्या दोन किलोची एक याप्रमाणं झेले बांधण्यात येत असून ते जमिनीवर न ठेवता टांगून ठेवावे लागतात. अन्यथा ते टिकत नसल्याचं ही शेतकऱ्यांनी सांगितलं. मोठ्या प्रमाणात पिकविलेल्या कांद्याची विक्री होत नसल्यानं हा कांदा कुठे साठवून ठेवायचा असा प्रश्न आता शेतकऱ्यांना सतावू लागला आहे. ऐन विक्री हंगामात लॉकडाऊन लागू असल्यानं पांढरा कांद्याच्या विक्रीवर त्याचा परिणाम झाला असून पांढरा कांदा उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे.

सफेद कांद्याचे औषधी गुणधर्म :

सफेद कांदयाला औषधी गुणधर्म आहेत. जर सर्दी किंवा कफची समस्या असेल तर ताज्या कांद्याचा रस गूळ आणि मधात टाकून प्यायल्यास ही समस्या दूर होते. रोज कांदा खाल्ल्यानं इन्शुलिन निर्माण होते. हे मधुमेह सारख्या आजारावर परिणाम करते. कच्च्या कांदयानं रक्तदाब ही नियंत्रणात राहतो. यात मिथाईल सल्फाईड आणि अमीनो अ‍ॅसिड असते. हे कोलेस्टेरॉल ही नियंत्रणात ठेवते. तसेच हृदयाच्या तक्रारींपासून ही दूर ठेवते. रोज कांदा खाल्ल्यानं रक्ताची कमतरता ही दूर होते. यामुळे अ‍ॅनिमियाही दूर होतो असे जाणकार शेतकरी सांगतात.

गेल्या पाच-सहा वर्षात सफेद कांदा हा अल्प प्रमाणात उत्पादित होत असे. मात्र गेल्या दोन-तीन वर्षात आमच्या गावात सर्वच शेतकरी सफेद कांदा लागवड करत आहेत. सफेद कांदाला जादा भावामुळे सफेद कांदा लावण्यासाठी गावातील सर्वच शेतकरी पुढे आले आहेत. आता कांदा तयार झाला असून. या वर्षी अचानक आलेल्या कोरोनामुले आम्ही विक्री घेऊन जाणारी शहरे व बस सेवा बंद असल्याने तसेच व्यापारी ही येत नसल्याने कांदा घरी पडून आहे. त्यामुळे सफेद कांदा लागवड शेतकऱ्याचे मोठे नुकसान होणार आहे. – अनिल गोपाळ जाधव, सफेद कांदा उत्पादक,शेतकरी, (म्हसरोली गाव)